Advertisement

कोरोना केंद्रांतील व्हेंटिलेटर महापालिकेच्या रुग्णालयांत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या सुविधेसाठी सज्ज करण्यात आलेली व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभाग (आयसीयू) मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

कोरोना केंद्रांतील व्हेंटिलेटर महापालिकेच्या रुग्णालयांत
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या सुविधेसाठी सज्ज करण्यात आलेली व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभाग (आयसीयू) मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. महापालिकेची मुख्य रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि प्रसूतिगृहामध्ये या सुविधा उपलब्ध होऊ शकतील आणि गंभीर रुग्णांना आवश्यक ती सेवा वेळेवर मिळू शकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर महापालिकेनं ठिकठिकाणी कोरोना काळजी केंद्र-१, कोरोना काळजी केंद्र-२, कोरोना आरोग्य समर्पित केंद्र, तसेच जम्बो कोरोना केंद्र सुरू केली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर हळूहळू काही छोटी कोरोना केंद्रे बंद करण्यात आली. सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. ही बाब लक्षात घेत भविष्यात कोरोना केंद्रांमध्ये सज्ज केलेले व्हेंटिलेटर आणि आयसीयू पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

त्यासाठी प्रशासनानं एक समिती नियुक्त केली असून ही समिती कोरोना केंद्रांतील व्हेंटिलेटर, आयसीयू आणि रुग्णालयांतील स्थितीचा आढावा घेण्याचं काम करीत आहे. महापालिकेची ३ मुख्य मोठी रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे आहेत. महापालिका रुग्णालयांमध्ये केवळ मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या अन्य भागांतून आणि परराज्यांतून मोठ्या संख्येनं रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे केईएम, शीव, नायर रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी असते. अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर असते. मात्र आयसीयू अथवा व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णांचे हाल होतात.

या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध आहेत. मात्र रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळं सुविधा तोकड्या पडू लागल्या आहेत. उपनगरांतील पालिका रुग्णालयांची स्थितीही तशीच आहे. कोरोना केंद्रांमध्ये सज्ज केलेले व्हेंटिलेटर, आयसीयू या रुग्णालयांमध्ये उपलब्ध केल्यास रुग्णांचे प्राण वाचू शकणार आहेत. कोरोना केंद्रांमध्ये काही सुविधा, यंत्रणा मर्यादित कालावधीसाठी उपलब्धकेल्या होत्या. त्यामुळे त्यापैकी कोणती साधनसामग्री पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करता येईल याचा आढावा समिती घेत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा