Advertisement

वाडिया रुग्णालयाचे भवितव्य महापालिकेच्या बैठकीवर अवलंबून

मुंबईतील परळी येथील वाडिया रुग्णालय बंद होणार की या रुग्णालाया पालिकेकडून मिळणारे थकित अनुदान मिळणार हे मंगळवारी ठरणार आहे.

वाडिया रुग्णालयाचे भवितव्य महापालिकेच्या बैठकीवर अवलंबून
SHARES

मुंबईतील परळी येथील वाडिया रुग्णालय बंद होणार की या रुग्णालाया पालिकेकडून मिळणारे थकित अनुदान मिळणार हे मंगळवारी ठरणार आहे. सोमवारी वाडिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाबाहेरील परिसरात आंदोलन केलं. यावेळी निधीअभावी वाडिया रुग्णालयात रुग्णांच अॅडमिशन घेणं बंद करण्यात आलं होतं. त्याशिवाय, राज्य सरकार आणि पालिकेकडून मिळणारे अनुदान थकीत असल्याचं कारण देत वाडिया रुग्णालय प्रशासनानं दोन्ही रुग्णालये बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र अस असताना आता महापालिका प्रशासनानं वाडिया रुग्णालय प्रशासनाच्या कारभारातील अनियमिततेवर बोट ठेवलं आहे.

रुग्णालय प्रशासनानं मूळ करारातील अटी व शर्तीचा भंग केला असल्याचा आरोप महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं ऐकून पुढील कारवाईची दिशा ठरवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे. मंगळवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच वाडिया रुग्णालयाला अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं, या बैठकीअंती रुग्णालय सुरू राहणार की बंद होणार हे स्पष्ट होणार आहे.

पालिकेकडून १३५ कोटीचे अनुदान येण्याचं बाकी असल्याचे रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. तर पालिकेच्या म्हणण्यानुसार केवळ २० कोटीचं देणं शिल्लक आहे. वाडिया रुग्णालयाच्या मुद्द्यावरून रुग्णालय प्रशासन आणि महापालिकेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेत मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीसाठी रुग्णालयाच्या प्रतिनिधींनाही बोलावण्यात येणार आहे.

वाडिया रुग्णालयास दान, देणगी, रुग्ण सेवा रुपानं प्राप्त झालेल्या उत्पन्नाचं विवरण महापालिकेला सादर करावं, गरीब रुग्णांवर केलेल्या खर्चाचं विवरण करावं, वाडिया रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी यांना २ वेतनाचं अधिदान केलं आहे का याचा खुलासा करावा अशा अटी रुग्णालय प्रशासनासमोर ठेवण्यात येणार आहे.



हेही वाचा -

जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये बुरशीयुक्त ब्रेड

मिठी नदी खालील मेट्रो भूयारीकरणाच्या कामाला गती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा