भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधात्मक लस कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटना या आठवड्यात मंजुरी देऊ शकते. अद्याप कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून आपातकालीन वापरासाठीच्या यादीत स्थान मिळालेलं नाही.
चाचणीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे आणि डेटा जुलै महिन्यात भारत बायोटेकनं जागतिक आरोग्य संघटनेला उपलब्ध करून दिला होता. आता सूत्रांचं म्हणणं आहे की, या आठवड्यात भारत बायोटेकच्या लसीला आरोग्य संघटना परवानगी देऊ शकते.
तज्ञांकडून या लसीचे आपातकालीन वापरासाठी पुनरावलोकन केलं जात होतं. जुलैमध्ये आरोग्य संघटेनेच्या दक्षिण-पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितलं की, एक तज्ज्ञ समिती डोजियरचा आढावा घेत आहे.
दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं फायझर, अॅस्ट्राझेनेका, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, सिनोव्हॅक आणि सिनोफार्म यांना आपातकालीन वापर यादीत जागा दिली आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या आपातकालीन वापराच्या यादीत कोव्हॅक्सिनला जागा मिळावी, अशी मागणी भारत बायोटेकनं केली आहे. याबाबत आरोग्य संघटनेनं आधीच कंपनीसोबत चर्चा केली आहे.
भारत बायोटेकनं काही दिवसांपूर्वी स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा डीसीजीआयला सादर केला आहे. याआधी, डीसीजीआयनं फेज I आणि फेज II ट्रायल डेटाच्या आधारे जानेवारी महिन्यात भारतात कोव्हॅक्सिनच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली होती. ही चाचणी भारतात २५ ठिकाणी करण्यात आली.
हेही वाचा