Advertisement

जागतिक मूत्रपिंड दिन- १७ पैकी एका भारतीयाला मूत्रपिंडाचा विकार


जागतिक मूत्रपिंड दिन- १७ पैकी एका भारतीयाला मूत्रपिंडाचा विकार
SHARES

'जागतिक मूत्रपिंड दिवसा'च्या निमित्ताने ८ मार्च रोजी सरकारी आणि खासगी रुग्णालयांत मूत्रपिंडा (किडनी)च्या विकाराबाबत जनजागृतीविषयक उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार मिरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयाने २ दिवसांपूर्वी 'डायलिसिस'वर असलेल्या रुग्णांसाठी 'म्युझिक थेरपी' आणि चर्चासत्राचं आयोजन केलं होतं.

भारतातील वैद्यकीय आकडेवारींनुसार, १७ पैकी एका भारतीयाला मूत्रपिंडाचा विकार असून गेल्या १० वर्षांत मूत्रपिंड निकामी होण्याचं प्रमाण दुप्पट झालं आहे.

सर्वसाधारणपणे मूत्रपिंडाचं कार्य ५ ते १० टक्के एवढंच सुरू असेल; तेव्हा डायलिसिसचा निर्णय घेतला जातो. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे डायलिसिसच्या पद्धती सुधारल्या आहेत आणि कमी वेदनांमध्ये आणि पथ्य पाळून वर्षांनुवर्षे डायलिलिस नियमित घेणं शक्य होतं. पण, डायलिसिसचे उपचार घेणारा रुग्ण एक प्रकारे मानसिक दबावाखाली असतो. यासाठीच वोक्हार्ट रुग्णालयातर्फे या रुग्णांचं समुपदेशन करण्यात आलं.


ज्या रुग्णांना ‘क्रॉनिक किडनी डिसिज’ असतात त्याचं मूत्रपिंड हळूहळू खराब होत जातं आणि त्यांच्यावर कायमस्वरूपी डायलिसिस करण्याची वेळ येऊ शकते. मूत्रपिंडाचं कार्य पूर्ववत करण्यासाठी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवला जातो. मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यापूर्वी रुग्णाचा आणि दात्याचा रक्तगट जुळणं आवश्यक असतं. रक्तगट जुळला तरच मूत्रपिंड दान करता येऊ शकतं. मूत्रपिंड दान करणं हे कुटुंबातील व्यक्तींनाच शक्य होतं. बाहेरच्या व्यक्तीचं मूत्रपिंड योग्य ठरत नाही किंवा ते भारतीय कायद्यातही बसत नाही. रुग्णाला त्याची आई, वडील, बहीण, पती, पत्नी, मुलगा, मुलगी यांपैकी कोणीही मूत्रपिंड दान करू शकतो.
- डॉ. महेश प्रसाद, मूत्रपिंडविकार तज्ज्ञ, वोक्हार्ट रुग्णालय


नेमकं कारण काय ?

'इंडियन क्रॉनिक किडनी डिसिज रजिस्ट्री’ नुसार मूत्रपिंड निकामी होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये ३५ टक्के वाटा मधुमेहाचा आणि १७ टक्के वाटा उच्च रक्तदाबाचा आहे. तसंच, बैठी जीवनशैलीसुद्धा त्याला कारणीभूत ठरते. त्यामुळे, डायलिसिसच्या त्रासापासून मुक्तता हवी असेल, तर मूत्रपिंड दानाविषयी समाजात जागृती करणं गरजेचं आहे.


विकारात दरवर्षी वाढ

वैद्यकीय आकडेवारीनुसार, भारतामध्ये अंदाजे २ लाखांहून अधिक रुग्णांना डायलिसिसची गरज आहे. पण, सद्यस्थितीत फक्त १ लाख रुग्ण डायलिसिसचे उपचार घेत आहेत,

तसंच, मूत्रपिंड खराब झाल्याने दरवर्षी २ लाख नवीन रुग्णांना डायलिसिस करण्यासाठी सुचवलं जातं. यातील फक्त ५० टक्केच रुग्ण पुढील उपचार घेतात. शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचं कार्य मूत्रपिंड करतं. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीनं होणं गरजेचं असतं. पण, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा