
नवी मुंबईतील तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच ठिकाणच्या ११०० घरांच्या लाॅटरीसाठी जानेवारीत जाहिरात काढण्याचं जाहीर करत सिडकोने इच्छुकांना खुशखबर दिली आहे. मात्र, त्याचवेळी या लाॅटरीतील एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ती म्हणजे या लाॅटरीतील सर्वच्या सर्व ११०० घरंही सर्वसाधारण (जनरल पब्लिक) गटासाठी असणार असल्याची माहिती सिडकोतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई लाइव्हला दिली आहे. त्यामुळे सामाजिक आरक्षण वा इतर आरक्षणाचा लाभ या लाॅटरीत मिळणार नाही.
२ आॅक्टोबरला सिडकोकडून तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या ठिकाणच्या १४ हजार ८३८ घरांसाठी लाॅटरी काढण्यात आली. या लाॅटरीतील ११०० घरांना शून्य प्रतिसाद मिळाला. म्हणजेच या घरांसाठी एकही अर्ज आला नाही. यातील बरीचशी घरं ही पत्रकारांसाठी आरक्षित होती. या घरांसाठी अर्ज न आल्यानं आता सिडकोनं या ११०० घरांसाठी स्वतंत्र लाॅटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोच्या नव्या ठरावानुसार, ज्या घरांना प्रतिसाद मिळणार नाही, त्या घरांची त्वरीत स्वतंत्र लाॅटरी काढली जाईल.
त्याचवेळी शून्य प्रतिसाद मिळालेल्या घरांसाठी स्वतंत्र लाॅटरी काढताना ती केवळ सर्वसाधारण गटासाठी काढण्याचाही निर्णय सिडकोनं घेतल्याची माहिती सिडकोतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे ही ११०० घरं सर्वसाधारण गटासाठीच असतील. अनुसूचित जाती, जमाती, भटके-विमुक्त, पत्रकार, कलाकार, प्रकल्पग्रस्त असा कुठलाही राखीव गट यात नसणार हे महत्त्वाचे. सिडकोच्या या निर्णयामुळे सर्वसाधारण गटातील इच्छुकांना दिलासा मिळणार आहे, पण आरक्षित गटातील इच्छुकांच्या पदरी मात्र मोठी निराशाच पडणार आहे.
हेही वाचा -
गिरणी कामगारांच्या ८ हजार घरांची लाॅटरी फुटणार की रखडणार?
पनवेलमधील ८००० घरांसाठी १५ दिवसांत लाॅटरी काढा, मुख्यमंत्र्यांचे म्हाडाला आदेश
