Advertisement

महारेराच्या १३३ पैकी ११९ तक्रारी सोडवल्या सामंजस्यानं; तक्रारदार आणि बिल्डरांमध्ये समेट

महारेरा कायद्याची अंमलबजावणी १ मे २०१७ पासून सुरू झाली आहे. तेव्हापासून महारेरात बिल्डरविरोधात तक्रारींचा पाऊस पडत आहे. मात्र, तक्रारींची संख्या खूपच असल्यानं निवारणासाठी वेळ लागत असल्यानं तसंच महारेरावर अतिरिक्त भार पडत असल्यानं महारेरानं सामंजस्य कक्षाची संकल्पना पुढं आणली.

महारेराच्या १३३ पैकी ११९ तक्रारी सोडवल्या सामंजस्यानं; तक्रारदार आणि बिल्डरांमध्ये समेट
SHARES

गृहखरेदीदारांच्या तक्रारीचा वाढत ओघ लक्षात घेता आणि तक्रारीचं त्वरीत निवारण व्हावं यासाठी महारेरानं मुंबई आणि पुण्यात सामंजस्य कक्ष स्थापन केला आहे. या सामंजस्य कक्षाला तक्रारदार ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर बिल्डरही ग्राहकांशी सामंजस्य करत त्यांच्या अडचणी दूर करताना दिसत आहेत.

आतापर्यंत मुंबई-पुण्यातील एकूण १३३ पैकी ११९ तक्रारीचं सामंजस्यानं निवारण करण्यात आल्याची माहिती मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी दिली आहे. ९० टक्के तक्रारदारांनी सामंजस्यानं तक्रारीचं निवारण केल्यानं सामंजस्य कक्षाचं हे मोठं यश मानलं जात आहे.


१ जानेवारीपासून सामंजस्य कक्ष

महारेरा कायद्याची अंमलबजावणी १ मे २०१७ पासून सुरू झाली आहे. तेव्हापासून महारेरात बिल्डरविरोधात तक्रारींचा अक्षरश पाऊस पडत आहे. या तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न महारेराकडून सुरू आहे. मात्र, तक्रारींची संख्या खूपच असल्यानं निवारणासाठी वेळ लागत असल्यानं तसंच महारेरावर अतिरिक्त भार पडत असल्यानं महारेरानं सामंजस्य कक्षाची संकल्पना पुढं आणली. त्यानुसार बिल्डरांचे काही प्रतिनिधी आणि मुंबई ग्राहक संघटनेचे काही प्रतिनिधींचा समावेश असलेले पाच सामंजस्य कक्ष पुण्यात तर दहा कक्ष मुंबईत स्थापन करण्यात आले.१ जानेवारी २०१८ पासून सामंजस्य कक्षाच्या कामाला सुरूवात झाली आहे.


थेट कक्षाकडं जाण्याची मुभा 

थेट महारेराकडे न येता सामंजस्य कक्षाकडं जाण्याची मुभा इथं तक्रारदारांना आहे.  तक्रारदार आणि बिल्डरची बाजू एेकून घेत सामंजस्यानं तक्रारीचं निवारण करण्यावर सामंजस्य कक्षाचा भर असतो. जर या कक्षाचा निर्णय तक्रारदाराला मान्य नसेल, तक्रारदाराचं समाधान झालं नसेल तर मग तक्रारदार महारेराकडे धाव घेऊ शकतो. अशा या सामंजस्य कक्षाला आठ महिन्यातंच तक्रारदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


९० टक्के निवारण

मुंबई अाणि पुण्यात आठ महिन्यांत एकूण १३३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यांपैकी ११९ तक्रारीचं कक्षानं यशस्वीपणे निवारण केलं आहे. म्हणजेच ९० टक्के तक्रारी या सामंजस्यानं सोडवल्या असून कक्षाच्या या कामगिरीचं कौतुक होत असल्याचंही अॅड. देशपांडे यांनी सांगितलं आहे.


केवळ एक हजार शुल्क

मुंबईतील १० कक्षामध्ये ७५ तक्रारी आल्या होत्या. त्यातील केवळ १२ तक्रारी कक्षाला निकाली काढता आलेल्या नाहीत. तर पुण्यातील ४४ तक्रारीपैकी केवळ २ तक्रारींमध्ये सामंजस्य झालं नसल्याचं अॅड. देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, केवळ एक हजार रूपये शुल्क भरत तक्रारदारांना तक्रारीचं तात्काळ निवारण करता येत अाहे. तसंच कक्षाच्या निर्णयाविरोधात बिल्डरला अपीलात जाता येत नसल्यानं अाणि न्यायालयाचा खर्च-वेळ वाचत असल्यानं तक्रारदार सामंजस्य कक्षाला पसंती देत असल्याचं दिसून येत अाहे.


नागपूरमध्येही सामंजस्य कक्ष 

सामंजस्य कक्षाला मिळणारा प्रतिसाद तसंच ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात इतर ठिकाणीही सामंजस्य कक्षाची स्थापना करण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. त्यानुसार नुकतचं नागपूरमध्ये सामंजस्य कक्ष सुरू करण्यात आला असून येत्या काळात नाशिकमध्येही कक्ष स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी मुंबई लाइव्हला दिली.  तर मुंबईत सामंजस्य कक्षाची संख्या वाढवण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा -

पात्रता तपासणी न केलेल्या म्हाडा कोकण मंडळाच्या विजेत्यांना पुन्हा संधी

मित्र-म्हाडा अॅप सुरू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा