भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळणार - बीडीडीवासियांचा म्हाडाला इशारा

  Lower Parel
  भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळणार - बीडीडीवासियांचा म्हाडाला इशारा
  मुंबई  -  

  म्हाडाच्या माध्यमातून नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळीतील बीडीडी चाळींचा वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यात येणार आहे. त्यानुसार लवकरच नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मात्र बीडीडीवासियांना डावलून हा पुनर्विकास करण्यात येत असल्याचे म्हणत वरळीतील बीडीडीवासियांनी म्हाडाला असलेला आपला विरोध कायम ठेवला आहे. त्यामुळे आता बीडीडीवासियांनी आक्रमक होत थेट भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा म्हाडासह सरकारला दिला आहे.

  नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील पुनर्विकासाचे कंत्राट अंतिम करण्यात आले असून नुकत्याच वरळीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे लवकरच नायगाव आणि ना. म. जोशी येथील प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाणार आहे. दरम्यान काही बीडीडीवासियांच्या संघटनांनी म्हाडाला असलेला विरोध मागे घेतला असला तरी वरळीतील रहिवासी मात्र अजूनही म्हाडाच्या विरोधात आक्रमक आहेत. बीडीडीवासियांची संमती घेत आणि त्यांच्या मागण्यांनुसार पुनर्विकास करावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही म्हाडा आणि सरकार कानाडोळा करत आहे. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास नकोच, असा पवित्रा या बीडीडीवासियांनी घेतला आहे. कुठल्याही पुनर्विकासासाठी रहिवाशांची संमती बंधनकारक असते. असे असताना बीडीडीसाठी मात्र रहिवाशांच्या संमतीची अटच म्हाडाने रद्द केली आहे आणि हाच मुद्दा पकडत वरळीतील बीडीडीवासियांनी म्हाडासह सरकारला धारेवर धरले आहे. याच मुद्दयावर त्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे.

   वरळीत बुधवारी रात्री उशीरा बीडीडीवासियांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बीडीडीवासियांनी म्हाडाकडून नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अखिल बीडीडी भाडेकरू संघाचे अध्यक्ष किरण माने यांनी दिली आहे. त्यामुळे बीडीडीवरून म्हाडा विरुद्ध बीडीडीवासिय असा संघर्ष तीव्र होणार असल्याचे म्हटले जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.