बीडीडीवासीयांचा सरकार- म्हाडाविरोधात एल्गार

 Naigaon
बीडीडीवासीयांचा सरकार- म्हाडाविरोधात एल्गार
Naigaon, Mumbai  -  

बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून राबवण्याला सुरुवातीपासूनच बीडीडीवासीयांचा विरोध होता. या विरोधाला डावलून सरकारने अखेर म्हाडाच्या माध्यमातूनच पुनर्विकास राबवण्यास सुरूवात केल्याने आता हा विरोध आणखी तीव्र झाला आहे. त्यातच बायोमेट्रीक सर्वेक्षणाच्या नावाखाली करार न करताच पात्रतेची निश्चिती सुरू केल्याने बीडीडीवासीय चांगलेच संतापले असून, त्यांनी आता सरकार आणि म्हाडाविरोधात दंड थोपटले आहेत. बीडीडीतील काही संघटनांनी एकत्र येत बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सरकार-म्हाडा कशी फसवणूक करत आहे हे बीडीडीवासीयांसमोर मांडण्यासाठी ‘पर्दाफाश’ नावावे जाहीर सभांचे आयोजन केले आहे. शनिवारी नायगावमध्ये जाहीर सभा पार पडली असून, या सभेला बीडीडीवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला असून, बीडीडीवासीयांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय पुनर्विकास मार्गी लावू दिला जाणार नाही असा निर्धार बीडीडीवासीयांनी व्यक्त केल्याची माहिती संघटनांनी दिली आहे.

झोपु योजना असो वा पुनर्विकास, कोणत्याही प्रकल्पासाठी रहिवाशांची 70 टक्के संमती आवश्यक असते. असे असताना बीडीडीसाठी मात्र ही अट रद्द करण्यात आली आहे. रहिवाशांची संमती न घेताच पुनर्विकास राबवला जात आहे. अतिक्रमित झोपड्यांच्या विकासासाठी संमती घेतली जात असताना आम्ही तर अधिकृत भाडेकरू आहोत, आम्ही सरकारला सर्व कर भरतो, भाडे भरतो, मग आमची संमती का नाही? असा सवाल करत सरकारकडून होणाऱ्या या दिशाभूलीबाबत बीडीडीवासीयांनी शनिवारच्या सभेत प्रचंड नाराजी व्यक्त केल्याची माहिती बीडीडी चाळ एकत्रित संघटनेच्या किरण माने यांनी दिली आहे. तर जोपर्यंत रहिवाशांशी करार केला जात नाही, रहिवाशांना नेमका प्रकल्प कसा आहे? याचे सादरीकरण केले जात नाही, बायोमेट्रीक सर्वे रद्द केला जात नाही, कॉर्पस फंड दिला जात नाही, मुंबईत कुठेही घर नाही ही अट रद्द केली जात नाही तोपर्यंत पुनर्विकासाची एकही वीट रचू दिली जाणार नाही, असा इशारा यावेळी अखिल बीडीडी चाळ महासंघाचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी दिला आहे.

शनिवारी नायगाव येथील ललित कला भवनात पार पडलेल्या सभेला दीड हजाराहून अधिक बीडीडीवासीयांनी हजेरी लावली होती. तर आता रविवारी रात्री ना. म. जोशी येथे अशीच सभा होणार असून, त्यानंतर वरळीमध्येही पर्दाफाश सभा पार पडणार असल्याचे माने यांनी सांगितले आहे. तर या सभा पार पडल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Loading Comments