बिल्डिंग उभी केली, भिंत कोण बांधणार?

 Pratiksha Nagar
बिल्डिंग उभी केली, भिंत कोण बांधणार?

सायन - प्रतिक्षानगर येथील म्हाडा कॉलनीतील चैतन्य सोसायटीच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाबाबत म्हाडाच्या मुंबई मंडळ, इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून चांगलीच टोलवाटोलवी सुरू आहे. ही संरक्षण भिंत बांधत असलेल्या तीन दुकानांना हटवण्याचे काम आपले नसल्याचे म्हणत दुरूस्ती मंडळाने ही जबाबदारी झटकली आहे. तर, या दुकानाचे भाडे दुरूस्ती मंडळ वसूल करते. ते ही दुकाने हटवण्याचे काम दुरूस्ती मंडळाचेच असल्याचे सांगत मुंबई मंडळ हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उदासीनता दाखवत आहे.

या दोन्ही मंडळांच्या वादात संरक्षण भिंत रखडली असून त्याचा फटका चैतन्य सोसायटीतील रहिवाशांना बसतोय. 2011 च्या सोडतीतील चैतन्यसह अन्य इमारतींची अल्पावधीतच कशी दुरवस्था झाली आहे, म्हाडाचे बांधकाम कसे दर्जाहीन आहे. यासंबंधीचे सविस्तर वृत्त तीन वर्षातच म्हाडाच्या इमारतींची दुरवस्था या मथळ्याखाली नुकतेच मुंबई लाइव्हने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबई मंडळाने इमारतीच्या दुरूस्तीचे काम सुरू केले. हे काम अद्याप सुरू आहे. मंडळाने लक्ष दिल्याने रहिवाशांनी मुंबई लाइव्हचे विशेष आभारही मानले. मात्र, या रहिवाशांचा महत्त्वाचा संरक्षण भिंतीचा प्रश्न अद्यापही जैसे थे आहे.

संरक्षण भिंत बांधायची आहे, पण त्यात तीन दुकानांच्या विस्थापनाचा अडथळा येत असल्याचे मुंबई मंडळाकडून सांगितले जात आहे. याविषयी दुरूस्ती मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी ही तीन दुकाने अपात्र असून त्यांच्याकडून दुरूस्ती मंडळ भाडेवसुली करते. पण, अपात्र दुकानांना पुनर्वसित कोणत्या कायद्यांतर्गत करायचे हा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पुनर्वसित करू शकत नाही, ते आमचे काम नाही, असे लेखी लवकरच मुंबई मंडळाला आम्ही कळवणार असल्याचे म्हणत या अधिकाऱ्याने हात वर केले आहेत. तर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांना विचारले असता, या प्रकरणी लक्ष घालू आणि हा प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पण, रहिवाशी मात्र मुंबई मंडळाच्या या उत्तराने समाधानी नाहीत. कारण, म्हाडाची ही दोन्ही मंडळे गेल्या कित्येक महिन्यांपासून असेच कोरडे आश्वासन देत आहे. त्यामुळे आता रहिवाशानांच रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.

Loading Comments