Advertisement

एेतिहासिक...पहिलं टीबीएम मुंबईच्या पोटात सोडण्यास सुरूवात


एेतिहासिक...पहिलं टीबीएम मुंबईच्या पोटात सोडण्यास सुरूवात
SHARES

स्थळ - नया नगर, माहीम मेट्रो-३ ची साईट, वेळ - ६ वाजून ४० मिनिटे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक बटण दाबतात आणि तोच भोंग्यासारखा मोठा आवाज सुरू होतो. टाळ्यांच्या कडकडाट... त्यानंतर ६० मीटर व्यासाच्या खोल उभारणी विहिरीलगत असलेले लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या रंगातील चक्र, अर्थात टीबीएम मशिनचे कटर हळूहळू या विहिरीच्या दिशेने सरकत गेले. काही मिनिटांतच हे कटर या विहिरीच्या आत गेले आणि नया नगरच्या मेट्रो-३ च्या साईटवर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित असलेले सर्वच जण एका एतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. मेट्रो-३ प्रकल्पातील एका नव्या, अवघड आणि महत्त्वाच्या टप्प्यालाही सुरूवात झाली.

मेट्रो-३ प्रकल्पातील ३३.५ किमी अंतराच्या भुयारी मार्गाच्या खोदकामाला आॅक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी टीबीएम अर्थात टनेल बोअरिंग मशिनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन चीनवरून दोन टीबीएम मशिन मुंबईत दाखल झाल्या आहेत. एक नयानगर तर दुसरी आझाद मैदानावर दाखल झाली आहे. या टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात शिरून कठीण दगड फोडत मेट्रोसाठी भुयारी मार्ग तयार करण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि कठीण काम करणार आहेत. त्यानुसार पहिली टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात सोडण्याच्या कामाच्या शुभारंभ गुरूवारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आला आहे.



महिन्याभरात टीबीएम मुंबईच्या पोटात शिरणार

गुरूवारी ६५टनाचे कटर विहिरीत सोडल्यानंतर आता टीबीएम मशिनचे इतर खुले भाग विहिरीत सोडत ते जोडण्यात येतील. त्यानंतर संपूर्ण टीबीएम मशिन तयार झाल्यानंतर हे मशिन दगड फोडत मुंबईच्या पोटात शिरून भुयारी मार्ग तयार करेल. म्हणजेच प्रत्यक्ष भुयारी मार्गाचे काम सुरू होण्यास आॅक्टोबर उजाडेल.


१७ मशिन दोन वर्षे मुंबईच्या पोटात

३३.५ किमीचा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी १७ टीबीएम मशिनचा वापर करण्यात येणार आहे. पहिली टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात शिरण्याच्या कामाला सुरूवात झाली असून आता एका पाठोपाठ १७ मशिन मुंबईच्या पोटात शिरतील. या मशिन एक दोन नव्हे, तर तब्बल २४ महिने अर्थात दोन वर्षे मुंबईच्या पोटात राहून भुयारी मार्ग तयार करण्याचे काम करणार आहेत.


माहिममधून शिरणार दादरमधून निघणार...

नया नगरमधून मुंबईच्या पोटात लवकरच शिरणारे हे मशिन भुयारी मार्ग खोदत खोदत दादर, प्रभादेवी मेट्रो स्थानकाच्या जागेतून बाहेर निघणार आहे. म्हणजेच हे मशिन ४ ते ५ किमीचा भुयारी मार्ग खोदणार आहे. तर माहीम ते वरळी या अंदाजे १२ किमीच्या अंतराचे भुयारी खोदकाम करण्यासाठी तब्बल ३ टीबीएम मशिनची गरज लागणार आहे. दिवसाला १० मीटरचे खोदकाम एक मशिन करणार आहे.


११० लाख क्युबिक मीटर माती निघणार

३३.५ किमीच्या भुयारी मार्गाच्या खोदकामातून तब्बल ११० लाख क्युबिक मीटर माती भूगर्भातून बाहेर काढण्यात येणार आहे. ही माती ठाणे आणि पालघर येथील दगडखाणीच्या बंद पडलेल्या प्रकल्पांमध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)कडून देण्यात आली आहे.


टीबीएम सुरक्षित, धोका नाही

टीबीएम मशिन तंत्रज्ञान अत्यंत सुरक्षित असून या भुयारी मार्गाच्या कामामुळे बांधकामाला वा मुंबईला कोणताही धोका होणार नाही. आज टीबीएम मशिन भूगर्भात उतरवण्याच्या कामाला सुरूवात होत असून हा एक एेतिहासिक क्षण आहे. मेट्रो-३ प्रकल्पाबरोबरच इतर मेट्रोच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार असून यामुळे इतर वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होणार. तेव्हा मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प २०२१-२२ पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री



हेही वाचा - 

मेट्रो-3 च्या नाईट शिफ्टवरील बंदी दोन आठवड्यांसाठी कायम



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा