Advertisement

मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने वाहतूक कोंडी

साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने वाहतूक कोंडी
Representational Picture
SHARES

मुंबई (mumbai) - नाशिक महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या साकेत पूल (saket bridge) भागातील मुख्य मार्गिकेच्या रुंदीकरणास सुरुवात झाली आहे.

साकेत पूल ते माजिवडा (majiwada) असे हे काम सुरू आहे. या कामास किमान तीन महिने लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबई, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

मुख्य मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गिकेवर आठ लेन वाहन चालकांना उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर साकेत पूलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. त्यामुळे काही महिने मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई - नाशिक (nashik) महामार्गावरून दिवसाला हजारो वाहनांची वाहतूक होत असते. उरण, जेएनपीटी आणि नाशिक येथून गुजरात किंवा भिवंडीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही याच मार्गावरून वाहतूक करावी लागते.

मुंबई - नाशिक महामार्गाचा रस्ता वडपेपासून समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचा (samriddhi highway) संपूर्ण भार या मार्गावर येणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारी कोंडी कमी करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 2021 मध्ये या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.

वडपे ते ठाणे या सुमारे 24 किलोमीटरची मार्गिका मे 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे ‘एमएसआरडीसी’चे नियोजन आहे. येथील अतिरिक्त नव्या मार्गिकांचे काम टप्प्या-टप्प्याने केले जात आहे.

परंतु आता मुख्य मार्गिकेच्या निर्माणाचे काम देखील सुरू झाले आहे. सोमवारपासून साकेत पूल ते माजिवडा उड्डाणपूल असे हे काम सुरू झाले आहे.

मुख्य मार्गिकाचे काम सुरू झाल्याने ठाण्याहून नाशिक, भिवंडी आणि नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने मुख्य रस्त्यालगत तयार करण्यात आलेल्या नव्या मार्गिकेवरून वाहतूक करत आहेत.

मुख्य मार्गिका बंद झाल्याने त्याचा परिणाम या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागला आहे. मार्गावर कोंडी होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पुढील तीन महिने या वाहतूक कोंडीचा ताप ठाणेकरांना सहन करावा लागणार आहे.

परंतु या मुख्य मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहन चालकांना आठ लेनची मार्गिका उपलब्ध होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अभियंत्यांनी दिली. असे असले तरी साकेत पूलावर केवळ चार लेनची मार्गिका उपलब्ध आहे.

साकेत पूलाचे काम सुरू झाल्यानंतर चालकांना पुन्हा कोंडीचा ताप सहन करावा लागणार आहे. या संदर्भात कापूरबावडी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. असे असले तरी त्या लगतच्या नव्या रस्त्यावरून वाहतूक सोडण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.



हेही वाचा

मेट्रो 9 च्या कंत्राटदाराला 40 लाखांचा दंड

मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू,

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा