Advertisement

मेट्रो-४ पण वादात! कास्टिंग यार्डला पर्यावरणप्रेमींचा विरोध

मेट्रो-४ च्या कास्टिंग यार्डला ठाण्यातील पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. सीआरझेड-१ परिसरात कायद्याचं उल्लंघन करत कास्टिंग यार्ड बांधण्यात येत असल्याचं म्हणत पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. गरज पडल्यास याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

मेट्रो-४ पण वादात! कास्टिंग यार्डला पर्यावरणप्रेमींचा विरोध
SHARES

मुंबईतून ठाण्याला काही मिनिटांत सुपरफास्ट पोहोचता यावं यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो-४ प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. मात्र या प्रकल्पाचं बांधकाम सुरू होण्याआधीच हा प्रकल्प वादात अडकला आहे. कारण मेट्रो-४ च्या कास्टिंग यार्डला ठाण्यातील पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. सीआरझेड-१ परिसरात कायद्याचं उल्लंघन करत कास्टिंग यार्ड बांधण्यात येत असल्याचं म्हणत पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. गरज पडल्यास याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.


तिवरांच्या कत्तलीला सुरूवात

मेट्रो-४ अंतर्गत कास्टींग यार्ड अर्थात मेट्रोच्या कामासाठीच्या आवश्यक साहित्याची निर्मिती करण्यासाठीची जागा तयार करण्यासाठी 'एमएमआरडीए'नं ठाण्यात दोन जागा पाहिल्या होत्या. मात्र त्या अंतिम न झाल्यानं शेवटी 'एमएमआरडीए'नं कावेसर इथली १५ एकरची जागा निश्चित केली आहे. तिवरांचं क्षेत्र असलेल्या आणि सीआरझेड-१ मध्ये येणाऱ्या या जागेवरील तिवरांची कत्तल करून कास्टिंग यार्ड उभारण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. हे सीआरझेड कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हणत जोशी यांनी या कामाला विरोध केला आहे.




बिल्डरविरोधात २ गुन्हे दाखल

दरम्यान याच जागेवर काही महिन्यांपूर्वी एका नामांकित बिल्डरकडून तिवरांची कत्तल करत भराव टाकला जात होता. त्याविरोधात जोशी यांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार त्या बिल्डरविरोधात २ गुन्हे दाखल करण्यात आले असून हे प्रकरण अद्याप निकाली लागलेलं नाही. त्यातच ही जागा सीआरझेडबाधीत असून या जागेवर कोणत्याही बांधकामास परवानगी दिली नसल्याचं ठाणे महापालिकेकडून कळवण्यात आलं आहे.

असं असताना आता या परिसरात 'एमएमआरडीए'कडून कास्टिंग यार्डचं काम सुरू करण्यात आलं आहे. पत्रे लावत जागा बंद करून आतमध्ये काम सुरू करण्याचा 'एमएमआरडीए' आणि कंत्राटदाराचा डाव असल्याचं म्हणत जोशी यांनी हे काम त्वरीत बंद करण्याची मागणी केली आहे. तर कास्टिंग यार्डची जागा बदलण्याचीही मागणी केली आहे.




कडक कारवाईची मागणी

तिवरांसंदर्भात नुकताच उच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय देत तिवरांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या आदेशानंतरही कास्टिंग यार्डचं काम सुरू असल्यानं हा न्यायालयाच्या आदेशाचा भंग असल्याचा आरोपही जोशी यांनी केला आहे. याआधी तिवरांची कत्तल करत भराव टाकणाऱ्यांसह आता कास्टिंग यार्ड बांधणाऱ्यांपर्यंत सगळ्यांविरोधात कडक करवाई करावी, अशी मागणीही जोशी यांनी केली आहे. तर याविरोधात लवकरच न्यायालयात धाव घेणार असल्याचंही 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं आहे.

मेट्रो-२ बी आणि मेट्रो-३ प्रकल्प चांगलेच वादग्रस्त ठरले असून यावरून सुरू झालेला वाद थेट न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे. असं असताना आता मेट्रो-४ लाही वादाचं ग्रहण लागलं आहे. कास्टिंग यार्डला विरोध वाढला आणि हे प्रकरणही न्यायालयात गेलं तर मेट्रो-४ प्रकल्पही रखडण्याची शक्यता यानिमित्तानं व्यक्त होत आहे. दरम्यान याविषयी 'एमएमआरडीए'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.



हेही वाचा-

मेट्रो २ ब आणि मेट्रो ४ साठी कंत्राटदारांची नियुक्ती, लवकरच कामाला सुरुवात

मेट्रो-४ ची धाव आता गायमुखपर्यंत, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो मार्गाचा गायमुखपर्यंत विस्तार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा