मेट्रो-४ ची धाव आता गायमुखपर्यंत, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो मार्गाचा गायमुखपर्यंत विस्तार

वडाळा-घाटकोपर-कासारवडली मेट्रोचा विस्तार गायमुखपर्यंत करण्यात आला असून यासंबंधीच्या प्रस्तावाला शुक्रवारी 'एमएमआरडीए' प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली.

SHARE

मुंबईकरांप्रमाणे गारेगार, पंचतारांकीत आणि सुपरफास्ट प्रवास करण्याचं ठाणेकरांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे, ते मेट्रो-४ प्रकल्पाच्या माध्यमातून. मुंबईला ठाण्याशी मेट्रोनं जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए) ने मेट्रो-४ प्रकल्प हाती घेतला आहे. मूळ आराखड्यानुसार मेट्रो ४ वडाळा ते कासारवडवली अशी धावणार होती. पण आता मात्र मेट्रो-४ वडाळा ते गायमुख अशी धावणार आहे.


मुख्यमंत्र्यांची मंजुरी

वडाळा-घाटकोपर-कासारवडली मेट्रोचा विस्तार गायमुखपर्यंत करण्यात आला असून यासंबंधीच्या प्रस्तावाला शुक्रवारी 'एमएमआरडीए' प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. त्यामुळे विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्यानंर आता मेट्रो-४ वडाळा ते गायमुख अशी धावणार आहे.किती खर्च?

३२.३२ किमी लांबीचा वडाळा ते कासारवडवली असा मेट्रो मार्ग असून यासाठी अंदाजे १५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर या मार्गात ३२ मेट्रो स्थानक असणार आहेत. या मार्गामुळे मुंबईहून ठाण्याला काही मिनिटांतच पोहचणं सहज शक्य होणार असल्यानं मुंबईकर आणि ठाणेकरांना या मार्गाची प्रतिक्षा आहे. कासारवडवलीच्या पुढे गायमुखपर्यंत मेट्रो न्यावी अशी ठाणेकरांची मागणी होती. ही मागणी मान्य करत 'एमएमआरडीए'ने मेट्रो-४ चा विस्तार गायमुखपर्यंत करण्याचा निर्णय घेतला होता.


३४.३९ किमीचा मार्ग

त्यानुसार विस्तारीकरणासंबंधीचा सविस्तर आराखडा 'एमएमआरडीए'कडून तयार करण्यात आला होता. या आराखड्याला अखेर मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता मेट्रो-४ मार्ग वडाळा-घाटकोपर-कासारवडवली-गायमुख असा असणार आहे. तर ३२.३२ किमीएेवजी आता हा मार्ग ३४.३९ किमीचा लांबीचा होणार असून आता त्यात २ अतिरिक्त मेट्रो स्थानकाची भर पडणार आहे. गोवनिवाडा आणि गायमुख अशी ही दोन अतिरिक्त मेट्रो स्थानकं असणार आहेत.


खर्चातही वाढ?

विस्तारीकरणामुळे खर्चातही वाढणार होणार असल्याने यासाठीच्या ९४९ कोटीच्या अतिरिक्त खर्चालाही प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेन्ट बँकेकडून निधी घेत हा मार्ग मार्गी लावण्यात येणार आहे. तर या मार्गाचं काम लवकरच हाती घेत २०२२ पर्यंत मेट्रो-४ मुंबईकर-ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा मानस असल्याचं प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.हेही वाचा-

मेट्रो-६ प्रकल्पाचा भार अाता दिल्ली मेट्रो काॅर्पोरेशनवर

सुस्साट वेगात बदलणार मुंबई!


संबंधित विषय