Advertisement

सुस्साट वेगात बदलणार मुंबई!

बघता बघता मुंबईत मेट्रो, मोनो धावू लागली. सी लिंकद्वारे समुद्रातून गाड्या धावू लागल्या. या प्रकल्पांमुळे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था निर्माण झाली असून पुढच्या काही वर्षांत मुंबई सुस्साट वेगात बदलणार आहे.

सुस्साट वेगात बदलणार मुंबई!
SHARES

मुंबईला कधी शांघाय, तर कधी सिंगापूर बनवण्याचं स्वप्न राज्य सरकारने मुंबईकरांना १५-२० वर्षांपूर्वी दाखवलं. हे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करण्याच्यादृष्टीने लागलीच सुरूवात करण्यात आली. मग काय त्यातूनच सी लिंक, मेट्रो, मोनो, स्कायवाॅक, कोस्टल रोड, मल्टीमाॅडेल रोड, एसी लोकल, एलिव्हेटेड लोकल, झोपडपट्टी पुनर्विकास, धारावी पुनर्विकास असे एक ना अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले. या प्रकल्पाचं कामही सुरू करण्यात आलं आणि बघता बघता मुंबईत मेट्रो, मोनो धावू लागली. सी लिंकद्वारे समुद्रातून गाड्या धावू लागल्या. या प्रकल्पांमुळे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था निर्माण झाली असून पुढच्या काही वर्षांत मुंबई सुस्साट वेगात बदलणार आहे.


येऊ घातलाय, हायपर लूपचा चमत्कार

मुंबईतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून मोनो, मेट्रो तसेच कोस्टल रोडसारखे प्रकल्प हाती घेण्यात आले. पण त्यापुढे जात आता बुलेट ट्रेनचा पायाही मुंबईतच रचला जात आहे. एवढं कमी की काय भविष्यातील 'हायपर लूप'सारखा प्रकल्पही मुंबईत तंत्रज्ञानाचं नवं बिज रूजवण्यास सज्ज झाला आहे.





त्यामुळे २०१७ मधील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पायाभूत सुविधा विकास प्रकल्प कोणता ठरला असेल तर हायपर लूप. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच हायपर लूप डोळ्यासमोरून नाहीशीही होते. हवेच्या दाबाने प्रतितास ८०० मैल वेगाने धावणाऱ्या अशा या चमत्कारीक हायपर लूपचा प्रयोग देशात पहिल्यांदाच होणार असून मुंबईपासून त्याची सुरूवात होणार ही तमाम मुंबईकरांसाठी अभिमानाचीच बात.


प्रकल्पाची चाचणी सुरू

मुंबई ते पुणे या हायपर लूप प्रकल्पासाठी चाचपणी सुरू झाली असून अमेरिकेतील व्हर्जिन हायपर लूप कंपनीच्या माध्यमातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हा प्रकल्प राबवणार आहे. हायपर लूपसारखी सुपर-सुपरफास्ट वाहतूक व्यवस्था प्रत्यक्षात आली, तर मुंबई ते पुणे हा ३ ते ४ तासांचा प्रवास केवळ १४ मिनिटांत हो, केवळ १४ मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे नक्कीच हा प्रकल्प मुंबईचा चेहरा-मोहरा बदलून टाकणार यात काही शंका नाही.


'बुलेट' निर्णय

दुसरीकडे २०१७ मध्ये ज्या प्रकल्पामुळे मुंबईत खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक सेवा निर्माण होणार आहे, असा प्रकल्प म्हणजे बुलेट ट्रेन. मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेन मार्ग बांधण्यात येणार असून यासाठी तब्बल १ लाख २० हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. ताशी ३५० किमी वेगाने धावणाऱ्या या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे ५०८ किमीचं अंतर काही तासांतच पार होणार आहे. या प्रकल्पावरून वाद सुरू असला, तरी हा प्रकल्प मुंबईच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळेच हा प्रकल्पही मुंबईला नवी ओळख देणारा ठरणार यात काही शंका नाही.



हायपर लूप आणि बुलेट ट्रेन हे महत्त्वाचेच प्रकल्प, पण त्यातही मुंबईतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करत मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास सुकर करणारा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मेट्रो प्रकल्प. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) वर मेट्रो मार्गी लावण्याची जबाबदारी असून 'एमएमआरडीए'ने आता मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळं निर्माण करण्याच्या कामाला वेग दिला आहे.


मेट्रोने या टोकावरून त्या टोकावर

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गामुळे मुंबईकर गारेगार आणि सुपरफास्ट प्रवासाचाचा अनुभव घेत आहेत, पण येत्या ५ ते ८ वर्षांत मुंबईत अनेक मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याने मुंबईतील कोणत्याही टोकावरून दुसऱ्या टोकावर मेट्रोने पोहचणं सहजसोपं होणार आहे. मुंबईतील पहिल्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ या भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाला खऱ्या अर्थाने २०१७ मध्येच वेग मिळाला आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा, खोदकामासाठी टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात सोडण्याचं काम सुरू झाले आहे. तर त्याचवेळी मेट्रो-२ आणि मेट्रो-७ सारख्या प्रकल्पांचंही काम सुरू झालं असून वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडी मेट्रो-४ सह ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या मेट्रो-६ च्या कामाला २०१७ मध्ये मंजुरी मिळाल्याने आता २०१८ मध्ये हे दोन्ही मार्गांचं प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.



या मेट्रो मार्गाव्यतिरिक्त अन्यही मेट्रो मार्गाची कामे यंदा 'एमएमआरडीए'ने हाती घेतली आहेत. त्या प्रामुख्याने उल्लेख होईल तो वडाळा ते जीपीओ मेट्रो-८, अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व मेट्रो-९ आणि दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो-१० या मार्गांचा. एकूणच २०१७ मध्ये 'एमएमआरडीए'ने मुंबईभर मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला असून यासाठी तब्बल ६२, ९४३ कोटी रुपये इतका खर्च 'एमएमआरडीए'कडून करण्यात येणार आहे.


'एमटीएचएल'चंही काम मार्गी

तर दुसरीकडे मुंबईला थेट नवी मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात शिवडी-न्हावा-शेवा सी लिंक प्रकल्प 'एमएमआरडीए'ने याआधीच हाती घेतला आहे. मात्र २२ किमीच्या या सी लिंक प्रकल्पात अनेक तांत्रिक अडचणी असल्याने हा प्रकल्प काही केल्या मार्गी लागत नव्हत्या. पण २०१७ मध्ये या प्रकल्पातील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच हा महत्त्वाकाक्षी प्रकल्प मार्गी लागणार असून मेट्रो आणि एमटीएचएल प्रकल्प मुंबईतील वाहतूक व्यवस्था मजबूत करतील, असा दावा 'एमएमआरडीए'कडून केला जात आहे.


विस्तारी मार्गाचं स्वप्न साकार कधी?

वरळी-वांद्रे सी लिंकचा वरळी ते नरिमन पाॅईंट असा विस्तार रखडल्याने वांद्रयावरून थेट नरिमन पाॅईटला सुपरफास्ट पोहचण्याचं मुंबईकरांचे स्वप्न स्वप्न राहिलं आहे. असं असलं तरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) ने वांद्रे ते वर्सोवा सी लिंक मार्गी लावण्याचं ठरवलं आहे. कारण वांद्रे ते वर्सोवा सी लिंक प्रकल्पाला नुकतीच राज्य सरकारने मंजुरी दिली अाहे. मार्च २०१८ मध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. हा सी लिंक झाल्यास वरळीवरून थेट वर्सोव्याला काही मिनिटातंच पोहोचता येणार आहे.

'एमएसआरडीसी'ने मुंबई ते नागपूर प्रवास सुकर आणि सुपरफास्ट करण्यासाठी समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे खरा, पण हा प्रकल्प सुरूवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. असं असलं तरी मुंबईतील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पातील हाही एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे.


हक्काचा निवारा

पायाभूत सुविधा प्रकल्प म्हटले की रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो, मोनो, बुलेट ट्रेन असे प्रकल्प डोळ्यासमोर उभे राहतात. मुंबईकरांना चांगली वाहतूक व्यवस्था पुरवणं हे सरकारचं मुख्य उद्दीष्ट आहेच. पण त्यातही प्रत्येक मुंबईकराच्या डोक्यावर हक्काचं छप्पर असणं अर्थात प्रत्येकाला हक्काचा निवारा देणं हेही तितकंच महत्वाचं. त्यामुळेच पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विचार केला जातो, तेव्हा गृहनिर्मिती प्रकल्पांचाही पायाभूत सुविधा प्रकल्पांध्ये सध्या प्रामुख्याने समावेश केला जातो. त्याअनुषंगाने मुंबईच्या विकासाचा लेखाजोखा मांडताना मुंबईतील गृहप्रकल्पांचा समावेश होणारच.


मिळेल 'प्रत्येकाला घर'

'प्रत्येकाला घर' असे म्हणत राज्य सरकारने २०१७ मध्ये मुंबईत पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेअंतर्गत पुढील ५ वर्षांत १६ लाखे घरं बांधण्याचं उद्दीष्ट म्हाडाने ठेवले आहे. त्यातील मोठ्या संख्येने घरे ही मुंबईत असणार आहे. पण मुंबईत मोकळी जागा शिल्लक नसल्याने म्हाडाने पुनर्विकासावर भर दिला आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाने हाती घेतला असून त्यातून म्हाडाला १० हजाराहून अधिक घरे उपलब्ध होणार आहेत. तर त्याचवेळी वरळीचा कायापालट या प्रकल्पामुळे होणार असल्याने मुंबईच्या विकासाच्यादृष्टीने हाही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

२०१७ मध्ये सुरू झालेल्या या सर्वच पायाभूत सुविधा विकास प्रकल्प येत्या ५ ते ८ वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण जेव्हा हे प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा नक्कीच मुंबई, बदललेली मुंबई, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा असलेली मुंबई पाहायला मिळेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा