Advertisement

कोकण रेल्वे मार्गावर डिझेल इंजिनावर धावणार्‍या सर्व गाड्या होणार बंद

महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ अशा ३ राज्यांची भाग्यरेषा ठरलेली कोकण रेल्वे आता सुसाट वेगाने धावणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर डिझेल इंजिनावर धावणार्‍या सर्व गाड्या होणार बंद
SHARES

महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ अशा ३ राज्यांची भाग्यरेषा ठरलेली कोकण रेल्वे आता सुसाट वेगाने धावणार आहे. येत्या काही महिन्यात कोकण रेल्वे मार्गावरून डिझेल इंजिनावर धावणार्‍या सर्व गाड्या बंद होणार असून आता यापुढे या मार्गावरुन फक्त विजेवर चालणार्‍या गाड्याच धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर अलिकडेच पहिले विद्युत इंजिन धावलं आहे. 

या इंजिनाची ट्रायल घेण्यात आली. त्यामुळं आता धूर सोडणारे इंजिन धावणार नाही. विद्युत इंजिनामुळे वेग वाढून कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास वेगवान होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर मागील ४-५ वर्षांपासून सुरू असलेलं विद्युतीकरणाचं काम अंतिम टप्प्याकडे आले आहे. रोहा ते रत्नागिरी या दरम्यान २२ फेब्रुवारीपासून ओव्हरहेड इलेक्ट्रिक वाहिनीमधून २५ केव्हीचा विद्युत प्रवाह टेस्टिंगसाठी कार्यान्वित केला गेला आहे.

या पार्श्वभूमीवर लोकोमोटिव, कोच मेंटेनन्स आदी कर्मचार्‍यांना कोकण रेल्वेच्या रिजनल मेकॅनिकल इंजिनिअर, रत्नागिरी यांच्याकडून सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. २३ फेब्रुवारीपासून वीज प्रवाहाची तपासणी करण्यात आल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदा विजेवर धावणारे इंजिन चालवून यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर रोहा ते रत्नागिरी असे पहिले विद्युत इंजिन धावले. ही यशस्वी चाचणी झाल्याने आता कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या यापुढे विजेवर चालणार आहेत.

रोहा ते रत्नागिरी दरम्यान, विद्युतीकरण पूर्णत्वाला गेले आहे. या मार्गावर गुरुवारी २०३ किमीची 'ट्रायल रन' पूर्ण केलेले इलेक्ट्रिक इंजिन रत्नागिरी येथून पुन्हा रोह्याकडे रवाना झाले. रोहा ते करंजाडी आणि दिवाण खवटी ते रत्नागिरी या रेल्वे मार्गावर ही इंजिन चाचणी यशस्वी झाली. त्यामुळं आता कोकण रेल्वे मार्गावर डिझेलऐवजी विजेवरील इंजिनाच्या सहाय्यानं मेल-एक्स्प्रेस धावणे शक्य होणार आहे.

या चाचणीमुळं आता कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर रोहा ते रत्नागिरीदरम्यान रेल्वे गाड्या विजेवर धावणार आहेत. दरम्यान, त्याआधी कोकण रेल्वेच्या दक्षिण भागात जानेवारी २०२१ मध्ये कोकण रेल्वेने ठोकूर-उडुपी दरम्यान इलेक्ट्रिक लोको यशस्वी चाचणी घेतली होती. तसंच, कोकण रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वीर ते रोहापर्यंत दुहेरी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच काही रेल्वे स्थानकादरम्यानही दुहेरी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे यापुढे कोकण रेल्वे मार्गाचा वेग आणखी वाढणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा