Advertisement

समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामाला गती द्या- उद्धव ठाकरे

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास आणखी गती देण्यात यावी.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामाला गती द्या- उद्धव ठाकरे
SHARES

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास आणखी गती देण्यात यावी. महामार्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्याबाबत तातडीने पावले उचलण्यात यावीत. महामार्गाचा हा टप्पा लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई- नागपूर यांना जोडणारा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सीलिंक यासह प्रस्तावित कोकण सागरी महामार्ग व कोकण एक्स्प्रेस वे या प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आढावा घेतला. वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी प्रकल्पांच्या माहितींचं सादरीकरण केलं.

७२ टक्के काम पूर्ण

नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे ७२ टक्के काम पूर्ण झालं आहे. उर्वरित कामं वेगाने पूर्ण करण्यात यावीत. या मार्गाच्या परिसरात पेट्रोलपंप, वाहनचालकांसाठीच्या सुविधा निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी यावेळी केल्या. तसंच इतर टप्प्यांची कामेही वेगाने पूर्ण करण्यात यावी. या कामांचा ऑगस्टमध्ये पुन्हा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा- मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा!, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

४ पदरी महामार्ग

कोकण सागरी किनारा महामार्ग हा कोकणासाठी महत्त्वपूर्ण मार्ग आहे. हा महामार्ग ४ पदरी करावा. त्यामुळे वाहतूक सुरक्षित होईल व पर्यटक वाढीसाठीही उपयोग होईल. त्याचप्रमाणे या महामार्गावरील खाडींवरील सर्व पुलांचं काम प्राधान्याने हाती घेण्यात यावेत. भूसंपादनाची कमीत कमी गरज भासेल, अशा प्रकारे कामाचं नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. हे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कोकण द्रुतगती मार्गाच्या आरेखनाचा सविस्तर आढावाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतला. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या दळण-वळण, पर्यटन तसंच पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भर पडणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन झाल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी सांगितलं. या महामार्गावर प्रवाशांसाठी सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण करण्यात येईल. समृद्धी महामार्गाच्या ठाणे व नाशिक भागातील कामेही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा