Advertisement

अॅन्टॉप हिलमध्ये गरीबांसाठी म्हाडाची ७८६ घरे, लॉटरी २०१८मध्ये?

अॅन्टॉप हिलमध्ये म्हाडाकडून अत्यल्प गटासाठी तब्बल ७८६ घरे बांधण्यात येत असून यातील २७८ घरांची लॉटरी मे २०१८ मध्ये फुटणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील विश्वसनीय सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

अॅन्टॉप हिलमध्ये गरीबांसाठी म्हाडाची ७८६ घरे, लॉटरी २०१८मध्ये?
SHARES

प्रतिक्षानगर वगळलं तर मुंबई शहरात गरीबांसाठी म्हाडाची घरांची लॉटरी निघाली, हे गेल्या कित्येक वर्षांत एेकिवातही नाही. इतकंच काय, तर मध्यम वा उच्च गटासाठीही दक्षिण मुंबईतील घरांसाठी म्हाडाने गेल्या काही वर्षात लॉटरी काढलेली नाही. त्यामुळे दक्षिण मुंबईसारख्या प्राईम लोकेशनवर परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची साधी संधीही गरीबांबरोबरच उच्च वर्गालाही मिळालेली नाही.


२७८ घरांसाठी २०१८मध्ये लॉटरी?

यंदा मात्र म्हाडाने लोअर परळमधील घरांची सोडत काढत उच्च वर्गाचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. आता त्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने गरीब, अत्यल्प गटासाठीसाठी गुडन्यूज दिली आहे! ती म्हणजे अॅन्टॉप हिलमध्ये म्हाडाकडून अत्यल्प गटासाठी तब्बल ७८६ घरे बांधण्यात येत असून यातील २७८ घरांची लॉटरी मे २०१८ मध्ये फुटणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील विश्वसनीय सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


१००० घरांसाठी निघणार सोडत

मे २०१८ मध्ये मुंबईतील घरांसाठी सोडत निघणार असून यात अंदाजे एक हजार घरांचा समावेश असेल आणि त्यात उपनगरातील घरांचाही समावेश असेल, असं मंडळाने याआधीच सांगितलं आहे. असं असताना मंडळाने घरांचा आकडा वाढवण्याचीही जोरदार तयारी आतापासूनच सुरू केली आहे. त्यातूनच दक्षिण मुंबईतील घरांचा शोधही मंडळाकडून घेतला जात आहे. त्याचाच भाग म्हणून अॅन्टॉप हिलमधील घरांकडे मंडळाने आता आपला मोर्चा वळवला असून यातील शक्य तितक्या घरांचा समावेश मे २०१८ च्या लॉटरीत करण्याचा प्रयत्न मंडळाचा असणार असल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.


स्थलांतर शिबिरांच्या पुनर्विकासाला सुरुवात

अॅन्टॉप हिल येथील म्हाडा लेआऊटमध्ये म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाची बैठी संक्रमण शिबिरे होती. या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना दुसऱ्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करत या शिबिराच्या पुनर्विकासाला मुंबई मंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार, या म्हाडा ले आऊटमध्ये ७८६ घरे लॉटरीतील विक्रीसाठी तर १३९ घरे संक्रमण शिबिराचे गाळे म्हणून बांधण्याचं काम सध्या वेगात सुरू आहे.


अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे

महत्त्वाचं म्हणजे ही ७८६ घरे गरीबांसाठी अर्थात अत्यल्प (ईडब्युएस) गटासाठी आहेत. ही ३०० चौ. फुटांची घरे असणार असून त्यासाठी टप्प्याटप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. दरम्यान, मंडळाच्या प्रस्तावानुसार येथील १३९ संक्रमण शिबिराचे गाळे दुरूस्ती मंडळाकडे हस्तांतरीत केले जाणार आहेत. तर ७८६ घरे मंडळाला विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.


२५ मजल्यांच्या चार इमारती

अॅन्टाॅप हिल म्हाडा ले आऊटमध्ये एकूण चार इमारती असणार असून या २५ मजल्याच्या असणार आहेत. या चारपैकी एका इमारतीचे काम सध्या वेगात सुरू असून या इमारतीत दोन विंग असणार आहे. यातील एका विंगमध्ये १३९ तर दुसऱ्या विंगमध्ये १३९ घरे आहेत. म्हाडाच्या धोरणानुसार चालू प्रकल्पातील घरांचा समावेश लॉटरीत करता येतो. त्यानुसार या घरांचा मे २०१८ च्या लॉटरीमध्ये सामावेश करण्याचा विचार मंडळाने सुरू केल्याचं समजतं आहे.



हेही वाचा

नवी मुंबईकर व्हायचंय? येतेय सिडकोची ८ हजार घरांची बंपर लाॅटरी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा