Advertisement

म्हाडाचं न्यू इयर गिफ्ट, फेब्रुवारीत १०८ दुकानांचा ई-लिलाव


म्हाडाचं न्यू इयर गिफ्ट, फेब्रुवारीत १०८ दुकानांचा ई-लिलाव
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे गेल्या कित्येक वर्षांपासून २०० हून अधिक दुकानं धूळखात पडून आहेत. यातील निम्म्या दुकानांना ओसी मिळालेली असतानाही दुकानांचा लिलाव करण्याचा विसर मंडळाला पडला होता. अखेर मंडळाला जाग आली असून लवकरच मुंबईतील दुकानांचा लिलाव होणार आहे. ओसी मिळालेल्या १०८ दुकानांचा फेब्रुवारीच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात ई-लिलाव होणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.


हजारो दुकानांचं वितरण

म्हाडाच्या प्रत्येक प्रकल्पात रहिवाशांच्या सोयीसाठी ठराविक व्यावसायिक गाळे अर्थात दुकानं बांधली जातात. या दुकानांचा लिलाव केला जातो. दुकानांची किंमत निश्चित करत इच्छुकांकडून अर्ज मागवले जातात. म्हाडाच्या किंमतीपेक्षा सर्वाधिक किंमत लावणाऱ्या अर्जदाराला दुकानाचं वितरण केलं जातं. अशा पद्धतीनं आतापर्यंत हजारो दुकानांचं वितरण मुंबई मंडळाकडून करण्यात आलं आहे.


तरीही लिलाव नाहीच

२०१० मध्ये मंडळाने १६९ दुकानांचा लिलाव केला होता. त्यानंतर मोठ्या संख्येनं दुकानं असतानाही मंडळानं गेली सात वर्षे त्यांचा लिलाव केलाच नाही. म्हाडाच्या परवडणाऱ्या घरासाठी जशा सर्वसामान्यांच्या उड्या पडतात, सर्वसामान्य जसे लॉटरीची वाट पाहातात त्याप्रमाणेच दुकानांच्या लिलावाचीही वाट पाहिली जाते आणि दुकानांच्या लिलावालाही अर्जदारांकडून मोठा प्रतिसाद मिळतो.

आता तब्बल सात वर्षानंतर १०८ दुकानांचा लिलाव होणार आहे आणि तोही ई-लिलाव पद्धतीने. पहिल्यांदा दुकानांचा ई-लिलाव होणार असून त्यासाठीची प्रक्रिया राबवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून स्वारस्य निविदा मागवण्यात आल्या आहेत. ४ जानेवारीला निविदा खुल्या करण्यात येणार असून त्यानंतर निविदा अंतिम करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये महिन्याभराचा काळ लागेल. त्यानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात १०८ दुकानांसाठी ई-लिलाव होईल, असंही लाखे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र या दुकानांच्या किंमतीच त्यांनी गुलदस्त्यात ठेवल्या आहेत.


ओसी मिळालेल्या, ई-लिलावामध्ये समाविष्ट असलेली दुकानं

  • प्रतिक्षानगर -३६
  • विनोबा भावेनगर -१४
  • स्वदेशी मिल, कुर्ला -५
  • तुर्भे, मंडाले -७
  • तुंगा, पवई -५
  • गव्हाणपाडा -११
  • शास्त्रीनगर, गोरेगाव -४
  • सिद्धार्थनगर, गोरेगाव -१
  • चारकोप, भूखंड क्र. १-२०
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा