Advertisement

मेट्रोमुळे झाले दुधाचे वांदे, म्हशी दूधच देईनात!


मेट्रोमुळे झाले दुधाचे वांदे, म्हशी दूधच देईनात!
SHARES

मुंबई - आरेतील युनिट 19 मध्ये मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)कडून मेट्रो-3 अंतर्गत माती परिक्षणाचे काम सुरू आहे. या कामाचा चांगलाच धसका युनिट 19 मधील गोठ्यातल्या म्हशींनी घेतला आहे. कामाच्या आवाजाने म्हशी घाबरल्या असून म्हशींनी पाणी पिणे कमी केले आहे. तर परिणामी दुधाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे येथील गोठ्यांच्या मालकांची चिंता चांगलीच वाढली आहे.

आरेतील कास्टींग यार्डची 3 हेक्टरची जागा वगळता आरेत इतर कुठेही कोणतेही बांधकाम करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. पण तरीही गुरुवारी सकाळपासून एमएमआरसीने पोलिसांच्या फौजफाट्यात, पोलीस बळाचा वापर करत बेकायदेशीररीत्या काम सुरू केले आहे. सरकारी यंत्रणाच कायदा मानत नसल्याचे म्हणत पर्यावरणवाद्यांनी आणि रहिवाशांनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. शुक्रवारीही पोलीस बंदोबस्तात एमएमआरसीने सकाळपासूनच कामाला सुरुवात केली आहे.

युनिट 19मध्ये जिथे माती परिक्षणाचे काम सुरू आहे तिथे 600 म्हशी आहेत. हा भाग अत्यंत शांत ठिकाणी आहे. पण आता मेट्रो-3 च्या कामासाठी गुरुवारपासून कामगारांच्या, पोलिसांच्या गाड्या आणि मशिनची येजा सुरू आहे. 

"या गाड्यांच्या आवाजाने कामाच्या अगदी जवळ असलेल्या अंदाजे 50 म्हशींना मोठा त्रास सहन करावा लागतोय," अशी माहिती गोठ्याचे मालक आय. जे. सिंग यांनी दिली आहे. माती परिक्षणासाठी मशीनने खोदकाम केले जात असून त्याचा आवाज खूप मोठा आहे तर जमीनही हदरते. त्यामुळे म्हशी घाबरल्या असून त्या अंगावर येत आहेत. तर गुरुवारपासून म्हशींनी पाणी पिणे कमी केल्याने 50 ते 60 लीटर दुध शुक्रवारी कमी निघाल्याचेही सिंग यांनी सांगितले आहे. किमान आठवडाभर हे काम सुरू राहणार असल्याने आठवडाभर म्हशींना हा त्रास सहन करावा लागणार आहे. या त्रासामुळे जनावरांना काही झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न गोठ्याच्या मालकांकडून विचारला जात आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा