Advertisement

मेट्रो-३ घेणार आणखी ७६ झाडांचा बळी!

मेट्रो-३ प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीचा आकडा हनुमानाच्या शेपटीसारखा वाढतच चालला आहे. एमएमआरसीनं झाडांच्या छाटणी-कत्तलीसाठी आतापर्यंत तब्बल ३४२६ अतिरिक्त प्रस्ताव सादर केले आहेत. त्यात आणखी ७६ झाडांची भर एमएमआरसीनं टाकली आहे.

मेट्रो-३ घेणार आणखी ७६ झाडांचा बळी!
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पासाठी अजून किती झाडांचा बळी जाणार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मेट्रो-३ प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीचा आकडा हनुमानाच्या शेपटीसारखा वाढतच चालला आहे. एमएमआरसीनं झाडांच्या छाटणी-कत्तलीसाठी आतापर्यंत तब्बल ३४२६ अतिरिक्त प्रस्ताव सादर केले आहेत. त्यात आणखी ७६ झाडांची भर एमएमआरसीनं टाकली आहे. यामुळे मेट्रो-३ प्रकल्पात एकूण ६३०३ झाडांचा बळी जाणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्च स्तरीय समितीने याचिकाकर्त्यांची हरकत लक्षात घेऊन वृक्ष प्राधिकरणाऐवजी ७६ झाडांच्या छाटणी/कत्तलीसाठी उच्च न्यायालयात जाण्याची सूचना एमएमआरसीला केली आहे. हा एमएमआसीएसाठी मोठा झटका मानला जात आहे.


मुंबई सेंट्रल स्थानकासाठी

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)ने मूळ आराखड्यानुसार मे २०१७ मध्ये मेट्रो-३ च्या कामासाठी २८०१ झाडांच्या छाटणी-कत्तलींसाठी परवानगी घेण्यात आली होती. त्यानंतर सातत्यानं अतिरिक्त झाडं कापण्यासाठी एमएमआरसीकडून प्रस्तावावर प्रस्ताव सादर होत आहेत. यामुळे पर्यावरणप्रेमी आणि याचिकाकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असून हा वाद आणखी चिघळताना दिसत आहे.

 

वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत

मेट्रो-३ च्या रूपानं ३२.५ किमीचा मुंबईतील पहिला भुयारी मार्ग उभारला जात आहे. राज्य सरकारसाठी देखील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दुसरीकडं हा प्रकल्प वेगवेगळ्या कारणांनं वादग्रस्तही ठरताना दिसत आहे. त्यातही झाडांच्या कत्तलीवरून प्रकल्पाला वादाचं मोठं ग्रहण लागलं अाहे. मुंबई उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा वाद गेला आहे.एमएमआरसीच्या धोरणावर नाराजी

असंच काहीस चित्र नुकत्याच झालेल्या उच्च न्यायालायाच्या उच्च स्तरीय समितीच्या सुनावणीदरम्यान दिसून आलं. कारण यावेळी एमएमआरसीनं मुंबई सेंट्रल येथील आणखी ७६ झाडं कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडं परवानगी मागितली असून याला पर्यावरणप्रेमी आणि याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.

तसा आक्षेप यावेळी आपण समितीकडे नोंदवल्याची माहिती पर्यावरणप्रेमी कुणाल बिरवडकर आणि झोरू बाथेना यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. एमएमआरसी सातत्यानं झाडांचा आकडा का वाढवत आहे? असा सवाल करत बिरवडकर आणि बाथेना यांनी एमएमआरसीच्या या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे.


झाडे कापण्याचे प्रस्ताव 'असे'

बाथेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२.५ किमीच्या मार्गात मूळ आराखड्यानुसार २८०१ झाडं कापण्याची गरज असल्याचं म्हणत त्यासंबंधीची परवानगी एमएमआरसीनं मे २०१७ मध्ये न्यायालयाकडून घेतली. मात्र त्यानंतर १५ स्थानकासाठी २१४ झाडांच्या कत्तलीचा प्रस्ताव एमएमआरसीनं आणला.त्यानंतर हे सत्र असंच सुरू राहिलं. मग लाॅन्चिंग शाफ्ट आणि कास्टींग यार्डसाठी ३१, आरे कास्टींग यार्डसाठी ४९, आरे लाॅन्चिंग शाफ्टसाठी २३, आरे इलेक्ट्रिकल टाॅवर शिफ्टिंगसाठी १३७, आरे स्थानकातून आरे कारडेपोत मेट्रो नेण्यासाठी ३०७ तर कारडेपोसाठी २६६५ अशी एकूण ३४२६ झाडांच्या छाटणी-कत्तलीचा एमएमआरसीचा प्रस्ताव आहे.

म्हणजेच आधीची २८०१ झाडं आणि अतिरिक्त ३४२६ झाडं आणि आता त्यात मुंबई सेंट्रलची ७६ झाडं अशी एकूण ६३०३ झाडं एकट्या मेट्रो-३ साठी बळी जाणार आहेत.


पर्यावरणप्रेमींचा विरोध

एका प्रकल्पासाठी इतक्या मोठ्या संख्येनं झाडं कापली जाणार असल्यानं त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होणार असल्याचं म्हणत पर्यावरणप्रेमींनी याला विरोध केला आहे. आमचा मेट्रोला विरोध नाही, पण झाडं वाचवत, पर्यावरण वाचवतं मेट्रो-३ कशी मार्गी लावता येईल याचा विचारच एमएमआरसीकडून केला जात नसल्यानं आमचा विरोध असल्याचंही बिरवडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही, पण मुंबई सेंट्रलच्या पॅकेजचं काम ज्या कंत्राटदार कंपनीकडे आहे, त्या कंपनीतील एका अधिकाऱ्यानं मात्र ७६ झाडं नव्यानं कापण्यात येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.हेही वाचा-

तर, मुंबई नामशेष होईल अन् मेट्रोच उरेल: उच्च न्यायालय

मेट्रो ३ चा ५ किमीचा भुयारी मार्ग पूर्ण

घाटकोपरसारखी विमान दुर्घटना झाल्यास कोर्टाकडे बोट दाखवू नका- उच्च न्यायालयसंबंधित विषय
Advertisement