Advertisement

मेट्रो 3 च्या जागेसाठी एमएमआरसी आरेवरच अडून


मेट्रो 3 च्या जागेसाठी एमएमआरसी आरेवरच अडून
SHARES

मुंबई - सेव्ह आरे आणि मुंबई मेट्रो वन कॉर्पोरेशन (एमएमआरसी)च्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी एमएमआरसीच्या कार्यालयात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार ही बैठक घेण्यात येत होती. या बैठकीत आरेच्या वादावर काही तरी तोडगा निघेल असे वाटत होते. पण आरे शिवाय पर्याय नाही, इतरत्र कारशेड नेताच येणार नाही याच भूमिकेवर एमएमआरसी ठाम राहिली आणि यापुढेही आपली भूमिका बदलणार नाही असेही एमएमआरसीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आरे वादावर या बैठकीत काही तोडगा निघाला नाही.

या बैठकीत सेव्ह आरेने कलिना येथे कारशेड बांधावे. तिथे मुबलक प्रमाणात  जागा आहे. त्यामुळे तिथे मेट्रोचे स्थानकही येणार आहे. तर या जागेवर झाडेही नसल्याने झाडांच्या कत्तलीचा प्रश्नच येत नसल्याचे म्हणत कलीनाच्या जागेचा प्रस्ताव ठेवला. एमएमआरसीचे संचालक (प्रकल्प) एस. के. गुप्ता यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळला. कलीनाच्या जागा योग्य नसल्याचे गुप्ता यांनी सांगितले, अशी माहिती सेव्ह आरेचे सदस्य स्टॅलिन दयानंद यांनी दिली आहे. कलीनाची जागा का नको याचे योग्य आणि सविस्तर उत्तर द्या, अशी मागणी सेव्ह आरेने रेटून धरली. पण एमएमआरसीकडून याचे उत्तर काही सेव्ह आरेला मिळाले  नाही. त्यामुळे ही बैठक अत्यंत निराशाजनक झाल्याचे सांगत स्टॅलिन यांनी आताही एमएमआरसीची ही आडमुठी भूमिका थेट मुख्यमंत्र्यांसमोरच मांडणार  असल्याचे स्पष्ट केले आहे. तर आता मुख्यमंत्र्यांनीच याप्रकरणी लक्ष घालत हा प्रश्न मार्गी लावावा अशीही मागणी करणार असल्याचे स्टॅलिन यांनी  सांगितले. दरम्यान गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कलीनाची जागा नाकारण्यात आल्याचे सांगत याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला.

आरेच्या जागेवर मेट्रो-2 चे कारशेड बांधण्यास आरेवासीय आणि पर्यावरण प्रेमींचा जोरदार विरोध आहे. मात्र याविरोधाकडे काणाडोळा करत एमएमआरसीकडून प्रकल्प पुढे रेटला जात असल्याने सेव्ह आरे विरूद्ध एमएमआरसीमधील वाद चिघळलेलाच आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सेव्ह आरेच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत कारशेड आरेतून हलवण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी इतर पर्यायांचा विचार करावा, असे म्हणत एमएमआरसीला सेव्ह आरेशी त्याबाबत चर्चा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही बैठक पार पडली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा