पनवेलमधील विजेत्या गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी सोमवारपासून विशेष मोहीम

'एमएमआरडीए'ने पनवेलमधील घरांचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी विशेष माेहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी ८ आॅक्टोबर ते १२ आॅक्टोबर दरम्यान वांद्रे, एमआयजी क्लबसमोरील समाज मंदिर हाॅलमध्ये हे विशेष शिबीर पार पडणार आहे.

SHARE

पनवेल, मौजे-कोन येथील 'एमएमआरडीए'च्या घरांसाठी विजेते ठरलेल्या ज्या गिरणी कामगारांची अद्याप पात्रता निश्चिती झालेली नाही, त्या कामगारांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं एक संधी उपलब्ध करून दिली आहे. पात्रता निश्चिती न झालेल्या तसंच विकल्प अर्ज सादर न केलेल्या कामगारांसाठी मंडळानं ४ दिवसीय विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष मोहिमेत कामगारांची पात्रता निश्तिती करत त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले जाणार असून या मोहिमेला सोमवारपासून सुरूवात होणार असल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


२ वर्षे होत आली

१ लाख ४८ गिरणी कामगारांना मुंबईत घर देणं शक्य नाही. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)च्या भाडेतत्वावरील ५० टक्के घरं ही गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्यानुसार पनवेल, मौजे कोन येथील २४१७ घरांसाठी २ डिसेंबर २०१६ मध्ये लाॅटरी काढण्यात आली. या लाॅटरीला आता २ वर्षे होत आली तरी अद्याप विजेत्यांना घराचा ताबा देण्यात आलेला नाही. याचं मुख्य कारण म्हणजे विजेत्यांची पात्रता निश्चितीच झालेली नव्हती.


पात्रता निश्चितीला सुरूवात

दरम्यान मुंबई मंडळानं काही महिन्यांपूर्वी पात्रता निश्चितीला सुरूवात केली असून काही विजेत्यांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली आहे. पण अजूनही अनेक विजेत्यांची पात्रता निश्चिती होणं बाकी आहे. त्यातच मुंबई मंडळानं विकल्प अर्जाचा पर्याय विजेत्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. म्हणजेच ज्या विजेत्याला पनवेलमध्येच लाॅटरीत लागलेलं घर हवी आहे की मुंबईत घर हवं आहे असे दोन विकल्प देत त्यातून एक विकल्प निवडून अर्ज भरून देणं सर्व विजेत्या कामगारांना बंधनकारक केलं. पण अनेक कामगारांनी हा विकल्प अर्जही भरलेला नाही.


विशेष शिबीर

पात्रता निश्चिती मार्गी लागत नसल्यानं आणि विकल्प अर्ज सादर न झाल्यानं वितरण वेगानं होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळं मंडळानं आता पनवेलमधील घरांचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी विशेष माेहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी ८ आॅक्टोबर ते १२ आॅक्टोबर दरम्यान वांद्रे, एमआयजी क्लबसमोरील समाज मंदिर हाॅलमध्ये हे विशेष शिबीर पार पडणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत कामगारांनी या शिबिराला हजेरीत लावत आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करावं, असं आवाहन मुंबई मंडळाकडून करण्यात आलं आहे.


हेही वाचा-

गिरणी कामगारांना पाहिजेत संक्रमण शिबिराची घरे!

गिरणी कामगारांसाठी खूशखबर! आधी अर्जांची छाननी मगच लॉटरी

संबंधित विषय
ताज्या बातम्या