Advertisement

मोतीलाल नगरचा ६० वा वाढदिवस, रहिवासी ६० ठिकाणी कापणार केक


मोतीलाल नगरचा ६० वा वाढदिवस, रहिवासी ६० ठिकाणी कापणार केक
SHARES

पुनर्विकासाबाबतच्या घडामोडींमुळे नेहमीच प्रकाशझोतात असलेलं गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर सध्या वेगळ्याचं कारणाने चर्चेत आहे. मोतीलाल नगर या म्हाडा वसाहतीची उभारणी होऊन १ जानेवारी २०२१ रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. हा ६० वा वाढदिवस अर्थात ‘हिरक महोत्सव’ मोठ्या जल्लाेषात साजरा करण्याचं येथील रहिवाशांनी ठरवलेलं आहे. त्यासाठी १ जानेवारीला खास कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार वसाहतीतील ६० वर्षांवरील ६० ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ६० ठिकाणी केक कापून हा दिवस सेलिब्रेट करण्यात येईल. 

मुंबईतील म्हाडाच्या एकूण ५६ वसाहतींपैकी गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर क्र.१,२,३ या वसाहतीने नेहमीच आपलं वेगळेपण जपलेलं आहे. ६० वर्षांपूर्वी म्हणजेच १ जानेवारी १९६१ साली भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते मोतीलाल नगरचं उद्घाटन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार या वसाहतीला स्वातंत्र्यसेनानी मोतीलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलं. गलिच्छ वस्ती निर्मूलन योजनेअंतर्गत गरीबांसाठी बांधलेली ही राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिली वसाहत असेल. लाॅटरी पद्धतीने नाही, तर घरांच्या बदल्यात घरे देऊन वसाहतीतील बैठी घरे गरीबांना वितरीत करण्यात आली होती. 

तब्बल १४३ एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या मोतीलाल नगरचा पुनर्विकास करण्याचं काम म्हाडा प्राधिकरणाने हाती घेतलं आहे. यासंदर्भात रहिवासी संघटनांसोबत म्हाडा प्राधिकरणाची सकारात्मक पातळीवर चर्चा देखील सुरू आहे. याच सकारात्मक विचारांना आणखी बळ देण्यासाठी ‘मोतीलाल नगर विकास समिती’ने पुढाकार घेतला आहे. सर्वसमावेशक पुनर्विकासासाठी लढतानाच मोतीलाल नगरवासियांच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आणि अमूल्य असणारा दिवस सेलिब्रेट करण्याचं आवाहनही समितीने तमाम रहिवाशांना केलं आहे. 

१ जानेवारी रोजी वसाहतीतील ६० वर्षांवरील ६० ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ६० ठिकाणी केक कापण्याचं नियोजन समितीतर्फे करण्यात आलं आहे. शिवाय सर्व रहिवाशांनी आपापल्या घरासमोर कंदील-दिवे लावून रोषणाई करण्याचं, हा दिवस एका उत्सवाप्रमाणे साजरा करण्याचं (सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळून) आवाहन देखील समितीतर्फे करण्यात आलं आहे. एखाद्या म्हाडा वसाहतीचा अशा रितीने साजरा करण्यात येणारा वाढदिवस ही मुंबईतील दुर्मिळ अशीच बाब म्हणावी लागेल.

मोतीलाल नगर वसाहतीतील विस्तीर्ण आणि मोक्याच्या जागेमुळे मधल्या काही वर्षांत बिल्डरांची बरीच आक्रमण झाली. परंतु रहिवाशांनी ऐक्य दाखवून दरवेळी प्रत्येक संकट लीलया परतून लावलं. यांत रहिवाशांचं योगदान वाखाणण्याजोगं आहे. मोतीलाल नगरला ६० वर्षे पूर्ण होत असताना, हा षष्ठ्याब्दी पूर्ती सोहळ्याचा आनंदाचा क्षण मोतीलाल नगरच्या प्रत्येक रहिवाशांच्या सहभागाने साजरा होणार आहे. 

नीलेश प्रभू, सचिव, मोतीलाल नगर विकास समिती

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा