बहुप्रतीक्षित कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा 15 सप्टेंबरपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे. वांद्रे सी लिंकपासून ते मरिन ड्राइव्हला जाणारी दक्षिण वाहिनी 15 सप्टेंबरपर्यंत खुली केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
मरिन ड्राइव्ह ते वरळी आणि सी लिंकपर्यंत व त्यापुढे वेगवान प्रवासासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या संपूर्ण प्रकल्पाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून करण्याचे उद्दिष्ट आहे.
मुंबई सागरी किनारा मार्ग प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. 10.58 किमीचा हा मार्ग आहे. यातील पहिला टप्पा वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक ते मरिन ड्राइव्ह 11 मार्च 2024 रोजी वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला.
मरिन ड्राइव्ह ते हाजी अली मार्ग लोट्स जंक्शनपर्यंत 10 जून 2024 रोजी सुरू केला. 11 जुलैला हाजी अली ते खान अब्दुल गफार खान पर्यंत साडेतीन किमीचा मार्ग सुरू झाला.
लोट्स जंक्शनवरून सी लिंकला जाण्यासाठी आंतरबदलातील एक मार्गिकाही सुरू करण्यात आली आहे. हे तिन्ही मार्ग खुले झाल्याने वाहन चालकांना मरिन ड्राईव्ह ते खान अब्दुल गफार खान मार्गावरून मुख्य मार्गाने सी लिंकना जाता येत आहे. वरळी सी लिंकपर्यंत विस्तार झाल्यास वरळी सी लिंकपासूनही व त्यापुढे झटपट जाता येणे शक्य होणार आहे. 15 मिनिटांत वांद्रे ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार आहे.
सी लिंकपर्यंतच्या विस्तारासाठी वांद्रे वरळी सी लिंकला दक्षिण वाहिनीच्या दिशेने गर्डर जोडण्यात आला आहे. दक्षिण वाहिनी सुरू झाल्यास वांद्रे- वरळी सी लिंकवरून मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होईल. 15 सप्टेंबरपर्यंत ही दक्षिण वाहिनी सुरू करण्यात येण्याची शक्यता, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
सी लिंक विस्तारातील उत्तरेकडील म्हणजे मरिन ड्राइव्ह ते वांद्रे दिशेनेही आणखी एक गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. हे काम पूर्ण करून संपूर्ण सागरी किनारा मार्ग डिसेंबर 2024 पर्यंत खुला केला जाणार आहे.
45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार
वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक ते मरीन ड्राइव्हपर्यंत कोस्टल रोडचा एक टप्पा 12 मार्च 2024मध्ये सुरू झाला होता. त्याअंतर्गंत प्रियदर्शिनी पार्क ते मरीन ड्राइव्हपर्यंत 2.07 किमी लांबीचा बोगदादेखील आहे. या मार्गिकेमुळं 45 मिनिटांचे अंतर 10 मिनिटांत पूर्ण होत आहे.
मरीन ड्राइव्ह ते हजी अलीपर्यंतचा 6.25 किमी लांबीचा दुसरा टप्पा वाहनांसाठी 10 जून रोजी खुला करण्यात आला होता. तर, हाजी अली ते वरळीपर्यंतचा हिस्सा 11 जुलैरोजी खुला करण्यात आला होता. त्यामुळं लोक 10 मिनिटांत वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंत पोहोचू शकणार आहेत.
हेही वाचा