Advertisement

नाहीतर मेट्रो ३ ला ब्रेक लावू, उच्च न्यायालयाने 'एमएमआरसी'ला ठणकावलं


नाहीतर मेट्रो ३ ला ब्रेक लावू, उच्च न्यायालयाने 'एमएमआरसी'ला ठणकावलं
SHARES

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ( एमएमआरसी) कडून राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सातत्याने अवमान होत असल्याचा आरोप याचिकाकर्ते आणि पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. त्यातच न्यायालयाने काम बंदीचा आदेश दिलेला असताना रात्री १० नंतरही बेकायदा काम सुरु ठेवत राहिवाशांना मनस्ताप देणाऱ्या 'एमएमआरसी'ला अखेर उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.


काय म्हणालं न्यायालय? 

न्यायालयाच्या आदेशानंतरही काम कसं सुरू ठेवता? असा सवाल करत यापुढेही रात्री १० नंतर मेट्रो ३ चं काम सुरु राहिल्यास न्यायालयाला मेट्रो ३ चं पूर्ण काम बंद करण्याचे आदेश द्यावे लागतील, अशा शब्दांत न्यायालयाने गुरुवारी 'एमएमआरसी'ला ठणकावल्याची माहिती याचिकाकर्ते रॅबिन जयसिंघाणी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.


ध्वनिप्रदूषणाविरोधात याचिका

मेट्रो ३ च्या कामामुळे आपल्या कुटुंबाला मनस्ताप होत असल्याचं म्हणत जयसिंघाणी यांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात याचिका दाखल केली आहे. मेट्रो ३ चं काम बंद करण्याची मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली आहे. सोबतच या मनस्तापाची भरपाई म्हणून कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला महिना १० हजार रुपये मिळावेत, अशी मागणीही केली आहे.  


इथं सुरू आहे रात्री १० नंतरही काम

याच याचिकेच्या सुनावणीदरम्यान रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत मेट्रोचं काम बंद करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश देत न्यायालयाने 'एमएमआरसी'ला मोठा धक्का दिला होता. या आदेशानुसार 'एमएमआरसी'ने काही दिवस रात्रीच्या वेळेस काम सुरू ठेवले. पण गेल्या १५-२० दिवसांपासून चर्चगेट, कुलाबा, मंत्रालय परिसरात रात्री १० नंतरही काम सुरू असल्याच्या नागरिकांच्या आणि याचिकाकर्त्यांच्या तक्रारी होत्या. यासंबंधी पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली होती. पण त्यातून काहीही निष्पन्न होत नव्हतं. त्यामुळे ही बाब गुरूवारी सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी थेट न्यायालयासमोर ठेवली.


मोठा दणका

'एमएमआरसी' न्यायालयाचंही एेकत नसल्याने न्यायालयाने प्रचंड नाराजी व्यक्त करत 'एमएमआरसी'ला पूर्णपणे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. हा 'एमएमआरसी'साठी हा मोठा दणका मानला जात असून यापुढे तरी 'एमएमआरसी' न्यायालयाच्या आदेशाचं पालन करते का? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.हेही वाचा

दादर, माहिमकरांनाही मेट्रो-३ ‘नकोशी’, फूटपाथला भेगा, भिंतींना तडे

मेट्रोकडून हवा मनस्तापाचा मोबदला पर डे रुपये दहा हजार! कफ परेडवासीयाची न्यायालयात धाव

मेट्रो-७ दुर्घटना: कंत्राटदाराला ५ लाखांचा दंड


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा