560 रहिवाशांची बीडीडीत यंदा शेवटची दिवाळी!

  Lower Parel
  560 रहिवाशांची बीडीडीत यंदा शेवटची दिवाळी!
  मुंबई  -  

  बीडीडी पुनर्विकास योजनेंतर्गत ना. म. जोशी मार्ग येथील 560 रहिवाशांच्या पात्रता निश्चितीसाठीचा बायोमेट्रिक सर्व्हे जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता रहिवाशांची अंतिम पात्रता निश्चिती करत या रहिवाशांशी येत्या दहा दिवसांत करार करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील विश्वसनीय सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. तर त्यानंतर लागलीच या 560 रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील 560 रहिवाशांची यंदाची दिवाळी ही चाळीतील शेवटची दिवाळी असणार आहे.

  ना. म. जोशी आणि नायगाव बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली असून लवकरच वरळीच्या पुनर्विकासालाही सुरुवात होणार आहे. दरम्यान ना. म. जोशी आणि नायगावमधील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून बायोमेट्रिक सर्व्हे करण्यात येत आहे. या बायोमेट्रिक सर्व्हेला ना. म. जोशीसह नायगावमधील रहिवाशांनी जोरदार विरोध करत हा सर्व्हे हाणून पाडला होता. सरतेशेवटी ना. म. जोशीमधील रहिवाशांचा विरोध मावळला आणि बायोमेट्रिक सर्व्हे मार्गी लागला.

  सर्व्हे पूर्ण झाल्याने आता ना. म. जोशीमधील 560 रहिवाशांच्या पात्रता निश्चितीचे काम वेगात सुरू असून पात्र रहिवाशांची यादी लवकरच मुंबई मंडळाला सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार दिवाळीनंतर, म्हणजे येत्या पंधरा ते वीस दिवसांत या रहिवाशांना जवळच्या संक्रमण शिबिरात हलवण्यात येणार आहे.


  1300 संक्रमण शिबिरांचे गाळे राखीव

  ना. म. जोशी आणि नायगावमधील बीडीडी रहिवाशांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी मुंबई मंडळाने गिरणी कामगारांच्या गृहप्रकल्पातील 1300 गाळे राखीव ठेवले आहेत. सेन्च्युरी मिल, प्रकाश कॉटन मिल, रूबी मिलसह अऩ्य तीन मिलच्या जागेवरील गृहप्रकल्पात संक्रमण शिबिराचे हे गाळे आहेत. याच गाळ्यांमध्ये या रहिवाशांना दिवाळीनंतर हलवण्यात येणार आहे.


  संक्रमण शिबिर सज्ज

  दिवाळीनंतर रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवायचे असल्याने संक्रमण शिबिराला प्राधान्याने मुंबई मंडळाने ओसी मिळवून घेतली आहे. ओसी मिळाल्याने संक्रमण शिबिरात वीज, पाणी आणि इतर सुविधाही पुरवत संक्रमण शिबिरे रहिवाशांसाठी सज्ज करण्यात आल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.  हेही वाचा

  संक्रमण शिबिरातील घरे लाटणारा दलाल जावेद पटेलला अटक


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.