Advertisement

नायगाव बीडीडी चाळीतील सर्व लाभार्थींना ५०० चौरस फुटांचं घर देणार- जितेंद्र आव्हाड

नायगाव बीडीडी चाळीत १ जानेवारी २०२१ पर्यंत जे नागरिक राहत आहेत ते सर्व जण सदनिका मिळण्यास पात्र आहेत. त्यांना ५०० चौरस फुटांची सदनिका देण्यात येणार असून शासन कोणालाही बेघर करणार नाही, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

नायगाव बीडीडी चाळीतील सर्व लाभार्थींना ५०० चौरस फुटांचं घर देणार- जितेंद्र आव्हाड
SHARES

नायगाव बीडीडी चाळीत १ जानेवारी २०२१ पर्यंत जे नागरिक राहत आहेत ते सर्व जण सदनिका मिळण्यास पात्र आहेत. त्यांना ५०० चौरस फुटांची सदनिका देण्यात येणार असून शासन कोणालाही बेघर करणार नाही, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी नायगाव येथील ललित कला भवन येथे भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून कोणीही प्रकल्पात अडथळा आणू नये, असे आवाहन डॉ.आव्हाड यांनी यावेळी केले.

पुढील १० दिवसात पहिल्या ४ इमारतींचे काम सुरू करण्यात येणार असून सुमारे ४०० लोकांचे स्थलांतर बॉम्बे डाईंग मिल मधील इमारतींमध्ये करण्यात येईल. ज्या लाभार्थींना तिथे जायचे नसेल त्यांना शासनातर्फे २२ हजार रुपये प्रतिमाह भाडे देण्यात येईल. या पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात उर्वरित दोन शासन निर्णय येत्या ८ दिवसात काढण्यात येतील. पोलिसांच्या घरांबाबतही सकारात्मक निर्णय झाला असून पुढील ८ दिवसात त्याचाही शासन निर्णय काढण्यात येईल, असे डॉ.आव्हाड यांनी सांगितले.

हेही वाचा- डेल्टा प्लसचा मुंबईत पहिला बळी, महिलेचा मृत्यू

देखभाल दुरुस्तीचा समावेश करारात करणार

इमारतींच्या देखभाल – दुरुस्तीचा समावेश करारात करण्यात येणार आहे तसेच पात्र – अपात्रते संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

आशियातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प

बीडीडी चाळींचा पुनर्वसन प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प असून हे महाराष्ट्राला गौरवास्पद आहे असेही डॉ.आव्हाड यांनी सांगितले.

यावेळी डॉ.आव्हाड यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच रहिवाशी यांचेशी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात संवाद साधला व रहिवाश्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यांनी स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींना शासनास सहकार्याचे आवाहन केले. यावेळी सदनिकेच्या प्रतिकृतीची पाहणीही डॉ.आव्हाड यांनी केली.नायगाव बीडीडी चाळीमध्ये ४१ इमारती असून ३ हजार ३४४ सदनिकांची निर्मिती करण्यात येणार आहे.

यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर,म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी योगेश म्हसे,स्थानिक नगरसेवक तसेच स्थानिक रहिवाशी व म्हाडाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा