Advertisement

डेल्टा प्लसचा मुंबईत पहिला बळी, महिलेचा मृत्यू

राज्यात डेल्टा प्लसची लागण झालेले २० नवे रुग्ण बुधवारी आढळले. त्यामुळे राज्यातील डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांचा आकडा ६५ झाला आहे.

डेल्टा प्लसचा मुंबईत पहिला बळी, महिलेचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असल्याने मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी गेला आहे. याशिवाय मुंबईत बुधवारी डेल्टा प्लसचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. 

डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या महिलेने कोविडवरील लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतरही डेल्टा प्लसमुळे महिलेचा बळी गेला.

मृत महिला पूर्व उपनगरात राहणारी होती. मधुमेहासह अन्य आजारांमुळे गुंगागुंत वाढत जाऊन या महिलेचा मृत्यू झाला. महिलेने कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले होते. कोरडा खोकला, अंगदुखीचा त्रास या महिलेला होत होता. तोंडाची चवही गेली होती. त्यानंतर कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात महिलेवर उपचार सुरू होते. ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्यानंतर रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्स त्यांना देण्यात येत होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

डेल्टा प्लस विषाणूची लागण होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचे जीनोम सीक्वेन्सिंगमध्ये स्पष्ट झालं आहे. डेल्टा प्लसचा हा राज्यातील दुसरा मृत्यू ठरला आहे. जूनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये डेल्टा प्लसने महिलेचा मृत्यू झाला होता.

राज्यात डेल्टा प्लसची लागण झालेले २० नवे रुग्ण बुधवारी आढळले. त्यामुळे राज्यातील डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांचा आकडा ६५ झाला आहे. राज्यात आतापर्यंत जळगाव १३, रत्नागिरी १२, मुंबई ११, ठाणे ६, पुणे ६; नांदेड, गोंदिया, रायगड, पालघरमध्ये प्रत्येकी २; पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर व बीडमध्ये प्रत्येकी १ रुग्णांची नोंद झाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा