परवानगीविनाच सुरु केलं मेट्रोचं काम!

 Mumbai
परवानगीविनाच सुरु केलं मेट्रोचं काम!

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्गाच्या कामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या. कुठेही बेकायदेशीररित्या काम होत नसल्याचा दावा एमएमआरसीकडून वारंवार केला जात आहे. मात्र हा दावा साफ खोटा असल्याचे उघड झाले आहे. मेट्रो-3 च्या कामासाठी एमएमआरसीने महाराष्ट्र राज्य प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाची परवानगीच घेतली नसल्याचं माहिती अधिकाराखाली उघड झालं आहे. प्रदूषण मंडळाची परवानगी न घेताच काम सुरू केल्याने मंडळानेही एमएमआरसीला दणका देत कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवल्याचेही माहिती अधिकारातून समोर आले आहे, असे वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले.

कुठल्याही प्रकल्पासाठी प्रदूषण मंडळाकडून परवानगी घेणे बंधनकारक असते. पण एमएमआरसीने मात्र प्रदूषण मंडळाची परवानगी न घेताच काम सुरू केले आहे. त्यामुळेच मंडळाने काही दिवसांपूर्वीच कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावत यासंबंधीचा जाब विचारला आहे. या नोटिशीनुसार कंत्राटदाराकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रदूषण मंडळाकडून मेट्रो-3 चे काम करण्यात येऊ शकते. त्यामुळे ही नोटीस एमएमआरसी आणि कंत्राटदारासाठी दणका मानला जात आहे.

एमएमआरसीने कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पुढे रेटायचा, त्यासाठी वाट्टेल ते करायचे असा चंगच बांधल्याचे दिसत आहे. मेट्रो-3 साठी प्रदूषण मंडळाचीच काय अनेक प्रकारच्या परवानग्या घेतल्याच गेलेल्या नसल्याचेही स्टॅलिन यांनी सांगितले आहे. तर एमएमआरसी सरकारची आणि मुंबईकरांची दिशाभूल करत असून मेट्रो-3 प्रकल्प हा खूप मोठा घोटाळा असल्याचाही आरोप केला आहे. एमएमआरसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद न साधण्याचा निर्णय घेतल्याने एमएमआरसीकडून याबाबतची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

Loading Comments