Advertisement

झोपुवासियांना ३२२ चौ. फुटांचे घर?


झोपुवासियांना ३२२ चौ. फुटांचे घर?
SHARES

मुंबई-झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत झोपडपट्टीवासियांना सध्या २६९ चौ. फुटांचे घर उपलब्ध होत होते. पण आता झोपुवासियांना मोठे घर मिळण्याची शक्यता दाट झाली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर झोपु योजनेंतर्गतही झोपुवासियांना ३२२ चौ.फुटांचे घर देण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करत हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यासंबंधीच्या सूचना नुकत्याच गृहनिर्माण विभागाच्या सचिवांना दिल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी 'मुंबई  लाइव्ह'ला दिली आहे. त्यामुळे झोपुवासियांसाठी ही मोठी खुशखबर म्हणावी लागेल.

झोपु योजनेद्वारे याआधी झोपुवासियांना २२५ चौ. फुटाचे घर दिले जात होते. मात्र ही घरे खूपच लहान असल्याने घराचे क्षेत्रफळ वाढवण्याची मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेत सरकारने २२५ चौ. फुटावरून २६९ चौ. फुटाचे घर झोपुवासियांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या झोपु योजनेत २६९ चौ. फुटाचे घर दिले जाते

दरम्यान, धारावी पुनर्विकास योजनेत झोपुवासियांना मोठी ४०० चौ. फुटाची घरे मिळत आहेत. त्यामुळे झोपु योजनेतही ३०० चौ. फुटाची घरे देण्याची मागणीने जोर धरु लागली आहे. त्यानुसार ३०० चौ. फुटाचे घर देण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सकारात्मक असून त्यासंबंधी विचार सुरू असल्याच्या बातम्या होत्या. आता मात्र त्यापुढे जात वायकर यांनी थेट ३२२ चौ. फुटाचे घर देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे जाहीर करत झोपुवासियांना खुश केले आहे

सर्वांसाठी घर अशी हाक देत पंतप्रधाना आवास योजनेंतर्गत राज्यात परवडणाऱ्या घरांची योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दहा लाख ३०० चौ. फुटांची घरे अत्यल्प उत्पन्न गटाला देण्यात येणार आहेत. असे असताना झोपुवासियांना मात्र २६९ चौ. फुटाचेच घर मिळते. त्यामुळे या दोन्ही योजनांमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने ३२२ चौ फुटाच्या घराचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याचेही वायकर यांनी सांगितले आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला, तर झोपुवासियांचे मोठ्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.



हेही वाचा

'झोपु'चा पुन्हा दणका! 30 बिल्डरांचे प्रकल्प रद्द


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा