भांडखोर सोसायट्यांना 'झोपु' प्राधिकरणाचा दणका

  Mumbai
  भांडखोर सोसायट्यांना 'झोपु' प्राधिकरणाचा दणका
  मुंबई  -  

  दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ...ही म्हण आता मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी लवकरच खरी ठरणार आहे. कारण 'झोपु' योजनेतील दोन गटांतील वादावादी आणि भांडणांमुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या 'झोपु' योजना स्वत: 'झोपु' प्राधिकरणाने विकासक म्हणून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 'झोपु' प्रकल्पातील सोसायट्यांचे वर्चस्व संपुष्टात येऊन सोसायट्यांकडून झोपडपट्टीवासीयांची होणारी फसवणूकही थांबण्यास मदत होणार आहे. त्यामुळे 'झोपु'च्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. 

  भांडुप येथील वक्रतुंड सोसायटीला 'झोपु' योजना राबवण्यासाठी प्राधिकरणाने 2009 मध्ये एनओसी दिली. पण 8 वर्षे झाली तरी पुनर्विकास मार्गी लागलेला नाही. याचे कारण म्हणजे येथील दोन गटात, दोन सोसायट्यांमध्ये असलेला वाद. एका गटाने जुन्या विकसकाला काम करू न देता नवीन विकसक आणण्याचा घाट घातला. तर एक गट जुन्या विकसकावरच ठाम होता. त्यामुळे प्रकल्प रखडल्याने 'झोपु' प्राधिकरणाने सर्वसाधारण सभा घेत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. पण या सर्वसाधारण सभेत 70 टक्के समंती न मिळाल्याने हा प्रकल्प पुन्हा रखडला. या दोन गटांच्या भांडणात गरजू झोपडपट्टीवासीयांचे मात्र हक्काचे घराचे स्वप्न दूरच राहत आहे.


  हेही वाचा - 

  झोपू योजनेतल्या रहिवाशांची उडाली झोप

  झोपु इमारतींना त्वरित ओसी मिळण्याचा मार्ग मोकळा


  या प्रकरणाच्या नुकत्याच झालेल्या सुनावणीच्या निकाल पत्रात 'झोपु' प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी तीन आठवड्यांत भांडण मिटले नाही तर हा प्रकल्प प्राधिकरण ताब्यात घेईल आणि तिथे स्वत: पुनर्विकास राबवेल असे नमूद केले आहे. त्यामुळे पाटील यांचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, असे अनेक प्रकल्प केवळ सोसायट्यांतील भांडणामुळे रखडल्याने अशा प्रकरणात सुनावणी घेत हे प्रकल्प स्वत: मार्गी लावण्याचाही निर्णय प्राधिकरणाने घेतल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

  असे दोनशेहून अधिक प्रकल्प - 

  केवळ आणि केवळ सोसायट्यांच्या भांडणामुळे रखडलेल्या प्रकल्पांची संख्या दोनशेहून अधिक असल्याचेही प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे. इतक्या मोठ्या संख्येने प्रकल्प रखडले तर मुंबई झोपडपट्टीमुक्त होणार नाही, असे म्हणत असे प्रकल्प स्वत: 'झोपु'ने मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.