Advertisement

'हा' वाद मिटल्यानंतरच माऊंड गॅलरीला परवानगी, एमएमआरडीएचा एमसीएला दणका


'हा' वाद मिटल्यानंतरच माऊंड गॅलरीला परवानगी, एमएमआरडीएचा एमसीएला दणका
SHARES

भाडे कराराचं उल्लंघन करणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ला अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)नं दणका दिला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंडावर दोन माऊंड गॅलरी बांधण्यासाठी परवानगी देण्यास एमएमआरडीएनं स्पष्ट नकार दिला आहे. भाडे कराराचा वाद मिटल्यानंतरच माऊंड गॅलरी बांधण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेत एमएमआरडीएनं एमसीएला दणका दिला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराखाली काढलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.


एमएमआरडीएकडे मागितली परवानगी

एमएमआरडीएने बीकेसीतील जी ब्लॉकमधील भूखंड एमसीएला भाडेतत्वाला दिला होता. पण एमसीएनं भाडे करारामधील अनेक नियमांचं उल्लंघन केलं असून यावरून वाद सुरू आहे. असं असताना एमसीएचे अध्यक्ष आणि भाजपा नेते आशिष शेलार यांनी २२ ऑगस्ट २०१७ रोजी या भूखंडावर दोन माऊंड गॅलरी बांधण्याची परवानगी एमएमआरडीएकडे मागितली आहे. तर १ सप्टेंबर २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलार यांच्या या पत्रावर परीक्षण करा, असा शेरा दिल्याची माहिती अधिकारातून उघड झालं आहे.


'हा' वाद मिटल्यानंतरच परवानगी

मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी १९ मार्च २०१८ मध्ये एमसीए अध्यक्ष आणि वास्तुविशारद शशी प्रभू यांना लेखी पत्राद्वारे माऊंड गॅलरीला परवानगी नाकारल्याचं कळवलं आहे. तर या पत्रात भाडेकरार उल्लंघनाचा वाद मिटल्यानंतरच परवानगी देण्याचंही एमएमआरडीएनं नमूद केलं आहे. त्यामुळे एमसीएसाठी हा मोठा दणका मानला जात असून माऊंड गॅलरीचा वाद चिघळण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान भाडे कराराचं उल्लंघन करणाऱ्या एमसीएविरोधात कारवाई करत सदर भूखंड ताब्यात घेण्याची खरी गरज आहे, असं म्हणत गलगली यांनी यानिमित्तानं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे भूखंड ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा