Advertisement

अबब! म्हाडाचं ग्रँट रोडमधील घर ५ कोटी ८० लाखाला

यंदाच्या लॉटरीतील ग्रँट रोडमधील उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत ऐकून तर तुम्हाला चक्करच येईल. हे घर १, २ कोटीत नव्हे तर चक्क ५ कोटी ८० लाखांत विकलं जाणार आहे.

अबब! म्हाडाचं ग्रँट रोडमधील घर ५ कोटी ८० लाखाला
SHARES

साधारणतः पाच वर्षांपूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळातील तुंगा पवई येथील घराची किंमत १ कोटी होणार असं म्हणताच सर्वांचेच डोळे पांढरे झाले होते. तर ही घरं लॉटरीमध्ये समाविष्ट करण्याची हिंमतही त्यावर्षी म्हाडाची झाली नव्हती. पण शेवटी ही घरं पडून राहिल्यानं घरांच्या किमती कमी करत ती घरं लॉटरीत आणली. तर पुढे महागडी घरं लॉटरीत येऊच लागली नि गेल्या वर्षी सर्वात महाग १ कोटी ९५ लाखात घर विकलं. म्हाडाच्या घरांच्या किमतीची कोटीच्या कोटी उड्डाणं सुरूच आहे.


सर्वात महाग घर 

यंदाच्या लॉटरीतील ग्रँट रोडमधील उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत ऐकून तर तुम्हाला चक्करच येईल. हे घर १, २ कोटीत नव्हे तर चक्क ५ कोटी ८० लाखांत विकलं जाणार आहे. ही घरं दोन असली तरी किमती भरमसाठ असल्यानं या घरांना प्रतिसाद मिळतो का? मिळाला तरी ही २ घरं विकली जातील का? हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, हे म्हाडाच्या लॉटरीच्या इतिहासातील सर्वात महाग घर आहे.


गेल्या लॉटरीत...

गेल्या लॉटरीत लोअर परळमधील २ घरं १ कोटी ९५ लाखांत तर येथीलच ३४ घरं १ कोटी ४५ लाखांत विकली गेली. या घरांना अपेक्षेप्रमाणे कमी अर्जदार आले. पण त्यापुढे जात ज्यांना ही २ घरं लागली त्या दोन्ही विजेत्यांनी म्हाडाला घरं परत केली. तर ३४ घरांतील अंदाजे २६ घरंही विजेत्यांनी परत केली नि महागड्या घरांमुळे मुंबई मंडळ तोंडावर आपटलं. त्यानंतर मात्र म्हाडाने घरांच्या किमती कमी केल्या.

अगदी अत्यल्प गटापासून उच्च उत्पन्न गटापर्यंत. तर म्हाडाने बांधलेल्या घरांपासून ते दुरुस्ती मंडळाकडून मिळालेल्या घरापर्यंत. नव्या धोरणाप्रमाणे किंमती कमी झाल्या हे खरं. पण यंदा दुरुस्ती मंडळाकडून मुंबई मंडळाला लॉटरीसाठी मिळालेल्या घरांची किंमत थेट ५ लाख ८० हजारांच्या घरात गेली आहे.


९८५ चौरस फूटाचं घर

ग्रँट रोडमधील कंबाला हिल येथील धवलगिरी इमारतीत ही दोन घरं असून त्याचं क्षेत्रफळ ९८५ चौरस फूट इतकं आहे. पहिल्यांदाच मुंबई मंडळाकडून दक्षिण मुंबईतील ग्रँट रोडसारख्या परिसरातील घराचा समावेश होतोय ही मोठी बाब आहे. पण या घरांना कसा प्रतिसाद मिळतो हाच आता प्रश्न आहे. कारण म्हाडाची घरं खासगी बिल्डरच्या तुलनेत थोडी स्वस्त असली तरी लॉटरीच्या दृष्टीने महाग वाटणारी घरं विकली जात नाही हाच आजवरचा अनुभव आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोअर परळ आणि तुंगा पवईतील घर. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मात्र या घराला १०० हून अधिक दावेदार अर्थात अर्जदार येतील, असा दावा केला आहे. हे घर खूप मोठं असून खाजगी बिल्डरच्या घराच्या तुलनेत किती तरी पटीनं स्वस्त असल्याचं म्हणत त्यांनी हा दावा केला आहे.


...अन्यथा ८ कोटी किंमत

म्हाडाने नुकत्याच घरांच्या किमती कमी केल्या आहेत. त्यानुसार लॉटरीसाठी दुरुस्ती मंडळाकडून मिळणाऱ्या घरांच्या किमतीही कमी केल्या आहेत. दुरुस्ती मंडळाकडून मिळालेल्या उच्च उत्पन्न गटातील घरं रेडिरेकनरच्या ७० टक्के दराने विकलं जाणार आहे. त्यानुसार या घरांची किंमत ५ कोटी ८० लाख इतकी आली आहे. अन्यथा हे घर ८ कोटीमध्ये विकावं लागलं असतं, असंही सामंत यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा - 

म्हाडाचा दिवाळी धमाका; १६ डिसेंबरला फुटणार १३८४ घरांसाठी लॉटरी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा