Advertisement

बीडीडींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्यात होणार


बीडीडींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्यात होणार
SHARES

नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या प्रत्यक्ष पुनर्विकासाला म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुरूवात झाली आहे. लवकरच पात्रता निश्चितीच्या कामालाही सुरूवात होणार आहे. मात्र बीडीडी चाळींचा पुनर्विकास हा खूप मोठा प्रकल्प असल्याने म्हाडाने हा पुनर्विकास योग्य प्रकारे मार्गी लावण्यासाठी टप्प्याटप्प्यात पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली आहे. त्यानुसार ना. म. जोशी मार्गाचा पुनर्विकास तीन टप्प्यांत, नायगावचा पाच टप्प्यांत तर वरळीचा पाच टप्प्यांत अशा एकूण 13 टप्प्यांमध्ये हा पुनर्विकास मार्गी लावण्यात येणार आहे.

नायगावमध्ये 42, ना. म. जोशी येथे 32 तर वरळीत सर्वाधिक 121 इमारती आहेत. या सर्व रहिवाशांना एकाच वेळी स्थलांतरीत करणे वा त्यांची पात्रता निश्चित करत त्यांच्यासाठी पुनर्वसित इमारत लवकरात लवकर बांधणे शक्य नाही. त्यामुळे मंडळाने टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात काही इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरीत करत इमारत रिकामी करत तिथे बांधकाम करायचे. त्याचवेळी त्यांची पात्रता निश्चित करायची. ही पुनर्वसित इमारत पूर्ण झाल्यास त्या रहिवाशांना (पात्र) पुनर्वसित नव्या इमारतीतील घरांचा ताबा द्यायचा. आणि मग दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करत याच प्रकारे पुनर्विकास पुढे न्यायचा अशी या टप्प्यांची रचना असल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अभियंत्याने दिली आहे.

टप्प्याटप्प्याने हा पुनर्विकास होणार असला तरी पुनर्विकास वेगाने करण्यात येणार असल्याचा दावाही मंडळाने केला आहे. त्यामुळेच नायगाव आणि ना. म. जोशी येथील पुनर्विकास पुढच्या सात वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. तर वरळीचा पुनर्विकास कंत्राट दिल्यापासून आठ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, वरळीसाठी निविदा मागवण्यात आल्या असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण बिल्डरांकडून या निविदेला मुदतवाढ देण्याची मागणी झाल्याने मुदतवाढ देण्यात आल्याची माहितीही या अभियंत्याने दिली आहे. येत्या काही महिन्यांतच वरळीचे कंत्राट अंतिम करत वरळीतील पुनर्विकासालाही सुरुवात करण्यात येणार असल्याचे लाखे यांनी स्पष्ट केले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा