आठवड्याभरात बीडीडीच्या कामाचा नारळ फुटणार

 Lower Parel
आठवड्याभरात बीडीडीच्या कामाचा नारळ फुटणार
Lower Parel, Mumbai  -  

नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या कामाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याची म्हाडाकडून सध्या जोरदार तयारी सुरू आहे. भूमिपूजनाची तारीखही ठरली असून बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून तारखेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तारखेची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. त्यामुळे आठवड्याभरात बीडीडीच्या कामाचा नारळ फुटणार हे निश्चित.

नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठीचे कंत्राट नुकतेच अनुक्रमे एल अॅण्ड टी आणि शापुरजी-पालनजी या कंपन्यांना बहाल करण्यात आले आहे. कंत्राट बहाल केल्याने आता प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात करण्याचा निर्णय घेत म्हाडाने भूमिपूजनाचा घाट घातला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात भूमिपूजन केले जाणार आहे. त्यासाठीची आवश्यक ती सर्व तयारी जोरात सुरू आहे. आता केवळ मुख्यमंत्री कार्यालयाकडून तारखेवर शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे झेंडे यांनी सांगितले आहे. 

भूमिपूजनानंतर लागलीच बांधकामाला सुरूवात करण्यात येणार आहे. जिथे मोकळी जागा असेल तिथे कामाला सुरूवात करण्याचा म्हाडाचा मानस असून शक्य तितक्या लवकरच प्रकल्प पूर्ण करत बीडीडीवासियांचे मोठ्या आणि चांगल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार असल्याचेही म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र काही संघटनांचा आणि बीडीडीवासियांचा म्हाडाला विरोध कायम आहे. त्यामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा या संघटनांनी दिला असून हे भूमिपूजन होऊ देणार नाही, असा पुनरूच्चार अखिल बीडीडी भाडेकरु संघाचे अध्यक्ष किरण माने यांनी केला आहे.

Loading Comments