Advertisement

Exclusive : वर्तकनगर पोलिस वसाहतीचा म्हाडा करणार पुनर्विकास, अतिरिक्त १००० घरं मिळण्याची शक्यता

वर्तकनगर पोलिस वसाहतीत सध्या ५६० घरं आहेत. ही वसाहत जुनी झाली असून गेल्या दहा वर्षांपासून ठाणे पोलिस या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न करत आहे. म्हाडाने हा पुनर्विकास करावा त्यासाठी ठाणे पोलिस म्हाडाला बांधकाम शुल्क देईल, अशी मागणी याआधीच ठाणे पोलिसांकडून म्हाडाला करण्यात आली होती.

Exclusive : वर्तकनगर पोलिस वसाहतीचा म्हाडा करणार पुनर्विकास, अतिरिक्त १००० घरं मिळण्याची शक्यता
SHARES

ठाण्यातील वर्तकनगर परिसरात अंदाजे २ एकरावर वर्तकनगर पोलिस वसाहत आहे. या वसाहतींचा पुनर्विकास करत त्या माध्यमातून पोलिसांना चांगली, मोठी हक्काची घरं देण्याचा पोलिस प्रशासनाचा विचार आहे. त्यानुसार आता लवकरच हा विचार प्रत्यक्षात आकार घेणार आहे. कारण वर्तकनगर पोलिस वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडा पुढे सरसावली आहे. 


५६० घरं मोफत

पोलिस वसाहतीचा पुनर्विकास करत त्यावर पोलिसांना ५६० घरं मोफत बांधून देत त्यातून अतिरिक्त १००० घर हाऊसिंग स्टाॅकच्या रूपानं मिळवण्याचा प्रस्ताव म्हाडाचा आहे. त्यानुसार हा प्रस्ताव ठाणे पोलिसांना पाठवण्यात आला असून यावर लवकरच अंतिम निर्णय होईल, अशी माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी मुंबई  लाइव्हला दिली आहे.


पोलिस-म्हाडा बैठक

वर्तकनगर पोलिस वसाहतीत सध्या ५६० घरं आहेत. ही वसाहत जुनी झाली असून गेल्या दहा वर्षांपासून ठाणे पोलिस या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न करत आहे. म्हाडाने हा पुनर्विकास करावा त्यासाठी ठाणे पोलिस म्हाडाला बांधकाम शुल्क देईल, अशी मागणी याआधीच ठाणे पोलिसांकडून म्हाडाला करण्यात आली होती. या मागणीनुसार अखेर आता म्हाडानं याकडे लक्ष दिलं असून पुनर्विकास करण्याची तयारी दर्शवली आहे. ठाणे पोलिस आणि म्हाडामध्ये यासंबंधी बैठका झाल्या असून या बैठकीनुसार म्हाडानं वर्तकनगर पोलिस वसाहतीचा प्रस्ताव तयार केला आहे.


अतिरिक्त घरं लाॅटरीसाठी 

या प्रस्तावाप्रमाणे म्हाडा फुकटात ५६० घरं पोलिसांना बांधून देईल. त्याशिवाय अत्याधुनिक असं पोलिस ठाणं आणि मल्टीपर्पज कम्युनिटी हाॅलही पोलिसांसाठी बांधून देईल. तर या पुनर्विकासातून जी १००० अतिरिक्त घरं तयार होतील ती घर म्हाडा सर्वसामान्यांसाठी लाॅटरीसाठी उपलब्ध करून देईल. त्यातही या १००० मधील काही घरं ही लाॅटरीद्वारे प्राधान्याने ठाणे पोलिसांसाठी राखीव ठेवली जातील, असा प्रस्ताव असल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे.


 प्रस्ताव गृहनिर्माण मंडळाकडं

हा प्रस्ताव आता ठाणे पोलिसांकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावाला ठाणे पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार आता लवकरच हा प्रस्ताव पोलिस गृहनिर्माण मंडळाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेत हा पुनर्विकास मार्गी लावला जाईल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा- 

मोतीलाल नगरचा पुनर्विकास मार्गी! फेब्रुवारीत काढणार निविदा

माहुलवासीयांसाठी म्हाडा देणार ३०० संक्रमण शिबिराचे गाळे




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा