Advertisement

मुंबईतील 'या' मार्गाचा लवकरच होणार कायापालट

पादचाऱ्यांसाठी पर्यावरणस्नेही पदपथ, वाहतूक कोंडीमुक्त रस्ता आणि पुलाखालील दुर्लक्षित भागाचे सुशोभीकरण करून मुलांसाठी खेळण्याची आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षक अशी आसनव्यवस्था करण्यात येत आहे.

मुंबईतील 'या' मार्गाचा लवकरच होणार कायापालट
SHARES

प्रभादेवी, दादर, परळ भागातून जाणारा, कायम वाहतूक आणि पादचाऱ्यांच्या वर्दळीत हरवून जाणारा सेनापती बापट मार्गाचा लवकरच कायापालट होणार आहे. पादचाऱ्यांसाठी पर्यावरणस्नेही पदपथ, वाहतूक कोंडीमुक्त रस्ता आणि पुलाखालील दुर्लक्षित भागाचे सुशोभीकरण करून मुलांसाठी खेळण्याची आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षक अशी आसनव्यवस्था करण्यात येत आहे. महापालिकेनं एका बड्या कंपनीच्या मदतीनं हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळं सेनापती बापट मार्गाचं रुपडंच बदलून जाणार आहे.

प्रभादेवी, दादर आणि परळ भागातून जाणाऱ्या सेनापती बापट मार्गावर ठिकठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. केवळ वाहतुकीसच नव्हे तर पादचाऱ्यांनाही त्याचा फटका बसतो. या मार्गावर दुतर्फा मोठ्या कंपन्यांची कार्यालयं, तसंच मोठ्या संख्येनं निवासी इमारती आहेत. यामुळं या मार्गावर पादचाऱ्यांचा कायम राबता असतो. पुलाखाली गर्दुल्ले, समाजकंटकांचा कायम वावर असतो. तसंच, काही भागांत अनधिकृतपणे वाहनतळ चालविण्यात येत आहे.

ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या 'जी-दक्षिण' विभागानं आपल्या हद्दीतून जाणाऱ्या सेनापती बापट मार्गाचा कायापालट करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात काकासाहेब गाडगीळ मार्गापासून गावडे चौकापर्यंतच्या सेनापती बापट मार्गावरील ८०० मीटर भागाचा कायापालट करण्यात येत आहे. या टप्प्यातील मार्गावरील दुतर्फा पदपथाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. सुशोभीकरणादरम्यान पादचारीस्नेही पदपथ उभारण्यात येणार आहेत.

या भागातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली गर्दुल्ले आणि समाजकंटकांचा वावर वाढला होता. तसंच, अनधिकृतपणे वाहनतळ चालविण्यात येत होतं. ही बाब लक्षात घेत या प्रकल्पाअंतर्गत महापालिकेने पुलाखालच्या भागाचं सुशोभीकरण हाती घेतलं आहे. इथं मुलांसाठी स्केटिंग, बॅडमिंटनची व्यवस्था आणि छोटेखानी वाचनालय  उभारण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी इथं बसता येणार आहे. छोटेखानी बैठकही घेता येईल. यासाठी पुलाखालील १,७१३ चौरस मीटर जागेचा वापर करण्यात येणार आहे. या पुलाच्या खांबावर विविध रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे हे खांब आकर्षक बनले आहेत.

पादचारीस्नेही पदपथांची निर्मिती करतानाच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यांवर मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सायकलप्रेमींसाठी इथं एक सायकल मार्गिकाही असणार आहे. ब्लॅक स्टोन ग्रुप आणि न्यूक्लियस ऑफिस पार्क यांच्या मदतीनं महापालिका हा प्रकल्प राबवत आहे.

रस्त्याचं सुशोभीकरण

  • सध्या प्रायोगिक  तत्त्वावर ८०० मीटर लांबीच्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. 
  • हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उर्वरित सेनापती बापट मार्गाचा कायापालट करण्यात येणार आहे.
  • या पदपथावरील क्षेत्र ६,८४४ चौरस मीटर इतके आहे. 
  • हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते ९,०७७ चौरस मीटर इतके होणार आहे.
  • या मार्गावर केवळ १३ वृक्ष आहेत. 
  • या प्रकल्पाअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
  • भविष्यात येथील वृक्षांची संख्या १४० होईल.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा