Advertisement

आम्हालाही टाॅवरमध्ये जायचंय! नायगाव बीडीडीकरांचा विरोध मावळला


आम्हालाही टाॅवरमध्ये जायचंय! नायगाव बीडीडीकरांचा विरोध मावळला
SHARES

नायगावमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांनी 'आधी करार मग बायोमेट्रीक सर्व्हे', असा आक्रमक पवित्रा घेतला होता. 'बायोमेट्रीक सर्व्हे' होऊ नये यासाठी तीन महिन्यांपूर्वी नायगावकर चक्क घराला टाळे ठोकून रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे तीन महिन्यांपासून येथील बायोमेट्रीक रखडले होते. त्याचा फटका बीडीडी पुनर्विकास प्रकल्पालाही बसत होता. मात्र ना. म. जोशी बीडीडी चाळीतील रहिवाशांनी बायोमेट्रीकला दिलेल्या सहकार्याकडे पाहून नायगावकरांचा बायोमेट्रीकला असलेला विरोधही मावळला आहे.  

यापूर्वी ना. म. जोशी बीडीडी चाळीतील ५६० रहिवाशांचं बायोमेट्रीक पूर्ण झालं असून लवकरच त्यांची पात्रता निश्चिती अंतिम करत त्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. हे सर्व पाहून आम्हालाही टाॅवरमध्ये जायचं आहे, आम्हालाही पुनर्विकास हवा आहे, असं म्हणत नायगावमधील बीडीडीकरांनी बायोमेट्रीकला सहकार्य करण्यास सुरूवात केली आहे. 

बहुतांश रहिवाशांनी स्वत: हून पुढं येत म्हाडासह जिल्हाधिकाऱ्यांकडे बायोमेट्रीकची मागणी केली. त्यानुसार तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी सकाळपासून नायगावमध्ये बायोमेट्रीक सर्व्हेला नव्याने सुरूवात झाल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकारी एस. एस. कोन्नुर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.




शुक्रवारी नायगावमधील इमारत क्रमांक १ ए आणि १९ ए मधील १६० बीडीडीकरांचे बायोमेट्रीक सर्व्हे पूर्ण झाल्याची माहिती बीडीडी चाळ उपक्रम सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण देसनेरे यांनी दिली. नायगावमध्ये ४२ चाळी असून त्यात अंदाजे ३३०० रहिवासी राहतात. हळहळू या उर्वरित रहिवाशांचेही बायोमेट्रीक मार्गी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


आमचा पुनर्विकासाला कधीही विरोध नव्हता. आमचा विरोध होता तो बायोमेट्रीकमधील काही त्रुटींना. करार आधी करावा ही आमची मागणी होती. म्हाडाने मधल्या काळात सर्व त्रुटी दूर केल्या असून करार पात्रता निश्चितीनंतरच करता येतो. त्यामुळे आता आमच्या विरोधाचा प्रश्नच येत नसल्याने सर्व रहिवासी स्वत:हून बायोमेट्रीकसाठी पुढे येत आहेत.

-लक्ष्मण देसनेरे, अध्यक्ष, बीडीडी चाळ उपक्रम सेवा समिती





राजू वाघमारेंना हुसकावून लावले?

पुनर्विकासासह बायोमेट्रीकला जोरदार विरोध करणारे बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघाचे अध्यक्ष डाॅ. राजू वाघमारे यांनी बायोमेट्रीक सर्व्हे सुरू झाल्याचे कळल्याबरोबर शुक्रवारी नायगावात धाव घेतली. मात्र रहिवाशांनी आम्हाला विकास हवा, असं म्हणत वाघमारे यांना हुसकावून लावल्याची माहितीही देसनेरे यांनी दिली.


दबावाखाली सर्व्हे?

याविषयी डाॅ. वाघमारे यांना  विचारले असता त्यांनी म्हाडासह स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात गंभीर आरोप केले. बायोमेट्रीक सर्व्हेच काय संपूर्ण पुनर्विकासात झोल आहे. असे असताना म्हाडा, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधी पैशांच्या बळावर आणि रहिवाशांवर दबाव टाकत बायोमेट्रीक सर्व्हे पार पाडून घेतल्याचा आरोप डाॅ. वाघमारे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला. तर बीडीडी पुनर्विकासाच्या प्रश्नी यापुढेही एकत्रित संघाचा लढा सुरूच राहील, असंही त्यांन स्पष्ट केलं आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा