अखेर विस्तारीत दक्षिण उड्डाणपुलाचा तिढा सुटला

 Mumbai
अखेर विस्तारीत दक्षिण उड्डाणपुलाचा तिढा सुटला

मुंबई - पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील मेट्रोच्या कामामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वेरावली गुंफेपर्यंतच्या विस्तारीत उड्डाणपुलाचा तिढा गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी एमएमआरडीए तसेच महापालिकेच्या अधिकार्‍यांसोबत घेतलेल्या बैठकीमुळे सुटला आहे. त्यामुळे या पुलाच्या विस्तारीकरणाचा मार्ग आता मोकळा झाल्याने लवकरच या पुलाच्या कामास सुरूवात करण्यात येणार आहे.

जोगेश्‍वरी पूर्व-पश्‍चिम (दक्षिण) जोडणारा उड्डाणपुल काही वर्षांपुर्वीच उभारण्यात आला. हा पुल बांद्रेकरवाडी येथे उतरवण्यात आला. या पुलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल असे नावही देण्यात आले. हा पुल वाहतुकीस खुला करण्यात आल्यानंतर पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सुटण्यास काही अंशी मदत झाली. परंतु जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडवरील वाहतुकीच्या कोंडीत वाढ झाली. ही कोंडी सोडविण्यासाठी जनतेच्या मागणीनुसार जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गाच्या जंक्शन ते महाकाली गुंफेपर्यंत असणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बांद्रेकरवाडी ते वेरावली हायलेवल महाकाली गुंफेपर्यंत उड्डाणपुल विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे पाठविण्यात आला होता. या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी तसेच या मार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राज्यमंत्री वायकर यांनी अनेक बैठकाही घेतल्या. पण, पश्‍चिम द्रुतगती मार्गावरुन जाणार्‍या मेट्रोच्या कामामुळे या उड्डाणपुलाचे काम गेले अनेक वर्षे रखडले होते. अखेर राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी या पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी शुक्रवारी एमएमआरडीए तसेच महापालिकेचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीत वायकर यांनी सुवर्णमध्य काढल्याने पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. वेरावलीपर्यंतच्या विस्तारीत उड्डाणपुलाचे सुमारे अडीच किलोमीटरचे काम महापालिका करणार असून मेट्रोच्या काही समाईक भागाच्या पुलाचे कामही महापालिका करणार आहे. या पुलाच्या उभारणीसाठी सुमारे 400 कोटी पेक्षा जास्त खर्च येणार आहे. तसंच लवकरच या पुलाच्या विस्तारीकरणाचे टेंडर काढण्यात येणार असून याचवर्षी कामासही सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती वायकर यांनी दिली. त्याचबरोबर ट्रामा हॉस्पिटलच्या बाजुला, दत्तटेकडी आणि वेरावली येथे मेट्रोची तीन स्थानके होणार असल्याचेही वायकर यांनी सांगितले.

Loading Comments