Advertisement

महाराष्ट्रात 'या' 5 ठिकाणी उभारणार शिवसृष्टी

शिवसृष्टीसह उद्यान, संग्रहालय तसेच शिवकालीन थिम पार्क व उभारणार

महाराष्ट्रात 'या' 5 ठिकाणी उभारणार शिवसृष्टी
SHARES

शिंदे - फडणवीस (Maharashtra Government) सरकार मोठा पर्यटन प्रकल्प राबवणार आहे.  महाराष्ट्रात 5 ठिकाणी शिवसृष्टी (Shiv Srushti Theme Park) उभारण्याचा हा प्रकल्प आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक आणि रामटेक येथे पाच ठिकाणी ही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.

शिवसृष्टीसह उद्यान, संग्रहालय तसेच  शिवकालीन थिम पार्क उभारणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढ यांनी दिली. यासाठी 410  कोटींची तरतुद करण्यात आली असून एक वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.

छत्रपती शिवरायांच्या  प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी हा यामागचा हेतू आहे. 

शिवसृष्टीच्या कामाबाबत जनतेच्या आलेल्या सुचनांनुसार या कामामध्ये बदल करण्यात येणार आहे. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी 70 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.

या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल.

मुंबईच्या गोराईत वॉर म्युझियम

गोराई  येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 25 एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे.

बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, छत्रपती संभाजी नगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय,रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी 50 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. 



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा