वरळी बीडीडीसाठी तीन बड्या कंपन्या उत्सुक

  Worli
  वरळी बीडीडीसाठी तीन बड्या कंपन्या उत्सुक
  मुंबई  -  

  वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने तब्बल तीन वेळा निविदेला मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडाच्या मुंबई मंडळावर आली होती. अखेर तीनदा मुदतवाढ दिल्यानंतर निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार तीन बड्या कंपन्यांनी निविदेसाठी उत्सुकता दर्शवली असल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

  ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील पुनर्विकासाचा याआधीच शुभारंभ झाला आहे. तर येथील रहिवाशांच्या पात्रता निश्चितेसाठी बायोमेट्रीक सर्व्हेक्षणाच्या प्रक्रियेलाही म्हाडाकडून सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी एप्रिलमध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. पण या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल तीन वेळा निविदेला मुदतवाढ देण्यात आली. मुंबई मंडळाकडून मात्र तांत्रिक अडचणींमुळे आणि बिल्डरांना निविदा सादर करण्यासाठी वेळ हवा असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जात होते.

  दरम्यान, तिसऱ्या मुदतवाढीनंतर तीन बड्या कंपन्या वरळी बीडीडीच्या पुनर्विकासासाठी पुढे आल्या आहेत. यात टाटा प्रोजेक्ट, एसीसी आणि आयएलएफएस या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. आता या कंपन्यांच्या निविदांची छाननी करत मग त्यांच्याकडून आर्थिक निविदा मागवण्यात येतील आणि मग त्यानंतर निविदा अंतिम करत कंत्राट बहाल करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. 

  वरळी बीडीडीच्या पुनर्विकासाला अखेर प्रतिसाद मिळाल्याने नायगाव आणि ना. म.जोशीपाठोपाठ आता रळीच्या पुनर्विकासालाही लवकरच सुरुवात होईल, असा विश्वासही या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील वरळी हा सर्वात मोठा प्रकल्प असल्याने या प्रकल्पाच्या निविदेकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने धारावीप्रमाणेच हा प्रकल्प रखडतो की काय? अशी भीती होती. पण अखेर निविदेला प्रतिसाद मिळाल्याने हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे.


  कसा आहे बीडीडी पुनर्विकास प्रकल्प

  ना. म. जोशी

  32 इमारती

  2480 रहिवाशी

  1 हॉस्पिटल

  शापुरजी पालनजी कंपनीला पुनर्विकासाचे कंत्राट

  पात्रता निश्चितीसाठी बायोमेट्रिक सर्व्हेक्षण सुरू

  आतापर्यंत 350 हून अधिक रहिवाशांचे सर्व्हेक्षण पूर्ण


  नायगाव

  42 इमारती

  3360 रहिवाशी

  एल अॅण्ड टी कंपनीला पुनर्विकासाचे कंत्राट

  पात्रता निश्चितीसाठी अद्याप बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाला सुरुवात नाही

  रहिवाशांचा बायोमेट्रिकला विरोध


  वरळी

  121 इमारती

  9680 रहिवाशी

  तीन कंपन्या पुनर्विकासासाठी उत्सुक

  लवकरच निविदा होणार अंतिम

  पुनर्विकासांतर्गत 160 चौ. फुटाच्या घराएवजी 500 चौ. फुटांचे घर मिळणार

  पुढील सात वर्षांत पुनर्विकास पूर्ण करण्याचा म्हाडाचा मानस  हेही वाचा

  शिवडीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकासही लवकरच मार्गी लागणार?


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.