Advertisement

मुंबई-गोवा महामार्ग होईपर्यंत राज्यात नव्या प्रकल्पांना बंदी, न्यायालयाची तंबी

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला झालेल्या विलंबावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई-गोवा महामार्ग होईपर्यंत राज्यात नव्या प्रकल्पांना बंदी, न्यायालयाची तंबी
SHARES

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला झालेल्या विलंबावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून महामार्गाचं काम रखडलेलं आहे. असं असताना देखील मुंबई-सिंधुदुर्ग द्रुतगती महामार्ग उभारणीचे काम हाती घेण्यात आले.

यावर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चांगलंच खडसावलं. मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलेलं असताना तुम्ही मुंबई-सिंधुदुर्ग द्रुतगती महामार्ग (मुंबई-सिंधुदुर्ग एक्स्प्रेस वे) उभारणीचे काम हाती घेणार आहात! असं चालणार नाही. जोपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही अन्य प्रकल्प सुरू होऊ देणार नाही', अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलं.

उच्च न्यायालयातील वकील आणि चिपळूणमधील मूळ रहिवासी अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी, खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था याविषयी जनहित याचिका दाखल केली होती. त्याविषयी पूर्वी दिलेल्या निर्देशांनुसार राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर महामार्गाच्या कामाची आतापर्यंतची प्रगती मांडली.

'दरवर्षी वाहतूक कोंडी, खड्डे, दुर्घटना हे किती वर्षे सुरू राहणार? आधी नव्या मुंबई-गोवा महामार्गाचे लाभ लोकांना मिळू द्या', असं सांगतानाच हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अन्य प्रकल्प सुरू होऊ देणार नाही, असा इशाराच खंडपीठानं दिला. तसंच डिसेंबरमध्ये कामाचा पुन्हा आढावा घेऊ, असं स्पष्ट करतानाच महामार्गावरील सर्व खड्डे बुजवण्यासाठी राज्य सरकार आणि एनएचआयएला तीन आठवड्यांची मुदत दिली.

२२ ऑक्टोबरला निविदा उघडून नवी कंपनी नेमून तिला काम पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर, २०२२ ही मुदत दिली जाणार आहे, अशी माहिती महाधिवक्ता कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली. उर्वरित नऊ टप्प्यांपैकी चार टप्प्यांचे काम ९० टक्क्यांपेक्षा अधिक, दोन टप्प्यांचे काम ६० टक्क्यांहून अधिक, दोन टप्प्यांचे काम ४० टक्क्यांहून अधिक तर एका टप्प्याचे काम १६ टक्के झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.



हेही वाचा

१२ जुन्या उड्डाणपुलांच्या जागी नव्या केबल पुलची उभारणी

प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी हे अंतर अवघ्या १० मिनिटांत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा