Advertisement

प्रभादेवीत आमदार चषक कबड्डीसाठी आंतरराष्ट्रीय थाट


प्रभादेवीत आमदार चषक कबड्डीसाठी आंतरराष्ट्रीय थाट
SHARES

आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने प्रभादेवीच नव्हे तर अवघ्या मुंबईकरांना प्रो कबड्डीच्या स्टार खेळाडूंचा आणि दिग्गज संघांचा खेळ पाहण्याची संधी लाभणार आहे. आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकाराने प्रभादेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा क्र. १९४ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत २६ ते ३० एप्रिलदरम्यान १२ व्यावसायिक संघांमध्ये आमदार चषक कबड्डी स्पर्धा रंगणार अाहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय थाट पाहायला मिळणार अाहे.


दोन महिन्यानंतर रिशांक मैदानात

मुंबईत झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेनंतर प्रथमच महाराष्ट्राचा स्टार खेळाडू रिशांक देवाडिगा मैदानात उतरणार आहे. रिशांकसह नितीन मदने, विशाल माने, मनिंदर सिंग आणि काशिलिंग आडके यांसारख्या जबरदस्त खेळाडूंमुळे आमदार चषक स्पर्धेची चुरस आणखी वाढली आहे.


स्पर्धेची गटवारी

१२ संघांना चार गटात विभागण्यात अाले असून अ गटात महिंद्रा आणि महिंद्रा, मध्य रेल्वे, देना बँक, ब गटात नाशिक आर्मी, एअर इंडिया आणि मुंबई बंदर, क गटातून बीईजी पुणे, महाराष्ट्र पोलीस, बँक ऑफ इंडिया आणि ड गटातून आयकर (पुणे), भारत पेट्रोलियम व यूनियन बँक हे संघ एकमेकांशी भिडतील. प्रत्येक गटातून दोन संघ बाद फेरीत धडक मारतील.


लाखोंची बक्षिसे अाणि दुचाकी

अंतिम विजेता संघ झळाळत्या आमदार चषकासह एक लाख ५१ हजार रूपयांचा मानकरी ठरेल तर उपविजेता संघ एक लाखाचा पुरस्कार पटकावेल. उपांत्य फेरीत पराभूत संघांनाही प्रत्येकी ५१ हजार रूपयांचे इनाम दिले जाईल. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला दुचाकी बक्षिस दिली जाणार आहे. सर्वोत्तम चढाईपटू, पकडपटू यांनाही आकर्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार अाहे.


शिस्तप्रिय संघांचा गौरव

कबड्डी संघांना आणि खेळाड़ूंना शिस्त लागावी म्हणून प्रत्येक सामना वेळेवर सुरू केला जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन न करताच बरोबर सायंकाळी 6 वाजता स्पर्धेचा उद्घाटनीय सामना सुरू होईल. जो संघ वेळेवर मैदानात दाखल होणार नाही, अशा संघावर कठोर कारवाई केली जाईल. बेशिस्त संघाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ताही दाखवला जाईल. त्याचप्रमाणे पंचांशी गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूवरही कारवाई केली जाईल.


हेही वाचा -

प्रभादेवीत बोकडासाठी घुमणार कबड्डीचा दम!

प्रभादेवीत वाळूवर रंगणार कबड्डीचा थरार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा