Advertisement

आंबेकर प्रतिष्ठानची विजयी दौड


आंबेकर प्रतिष्ठानची विजयी दौड
SHARES

वैभव नरळेच्या अष्टपैलू खेळामुळे आंबेकर प्रतिष्ठान फायटर्स संघाने निमसाई लायटर्स संघाचा 37-30 असा पराभव करून शालेय मुलांच्या 'मुंबई सुपर लीग कबड्डी स्पर्धे'त विजयी दौड कायम राखली. तर मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमी आयोजित वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरातील दुसऱ्या साखळी सामन्यात व्हीबज्यॉर सेव्हन संघाने सहकारी भांडार अचिव्हर्स संघावर 57-53 अशी मात करत सुपर-स्वीस लीगमधील स्थान निश्चित केले.

आंबेकर प्रतिष्ठान फायटर्सचा अष्टपैलू खेळाडू वैभव नरळे, चढाईपटू बिनीत मंडल, बचावपटू आझाद केवट यांनी उकृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले. त्याला निमसाई लायटर्सचा अष्टपैलू खेळाडू सुजीत रामगडे, चढाईपटू मासूम अली सय्यद, बचावपटू ओमकार कामतेकर यांनी चांगली लढत दिली. आंबेकर प्रतिष्ठान संघाने मध्यंतराला 14-11 अशी आघाडी वाढवीत सामना 37-30 अशा फरकाने जिंकला.

तर, दुसऱ्या साखळी सामन्यात व्हीबज्यॉर सेव्हन संघाने सहकारी भांडार संघाला 57-53 अशी मात देत सलग दुसरा विजय नोंदविला. दोन्ही संघाकडून एकूण 110 गुणांची उधळण झाली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत व्हीबज्यॉर सेव्हन संघाचे चढाईपटू सूरज सुतार, विशाल चव्हाण, राहुल ठाकूर आणि सहकारी भांडार अचिव्हर्सचे चढाईपटू सूरज मिश्रा, ऋषिकेश खेडेकर, आदेश कवडे यांनी सुंदर खेळ केला. सहकारी भांडारच्या सूरज मिश्राने एका चढाईत प्रतिस्पर्ध्याचे 4 गडी टिपून मिळविलेली आघाडी त्यांना टिकविता आली नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा