SHARE

प्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी मैदानात अखेरच्या दिवशी बोकड-कोंबडी पटकावण्यासाठी तुंबळ युद्ध रंगले होते. भवानीमाता आणि ओम श्री साईनाथ यांच्यात झालेला अंतिम सामना पहिल्या सत्रात रंगतदार झाला. अखेर आगरी कबड्डी महोत्सवातील बोकडासाठी झालेल्या जेतेपदाच्या लढतीत भवानीमाता क्रीडा मंडळाने ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्टचा ३०-१९ असा सहज पराभव करून द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. भवानीमातेचा चढाईपटू सुशांत धाडवे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.


सुशांतची एक चढाई निर्णायक

मध्यंतराला ओम श्री साईनाथ संघ १४-१३ अशा अाघाडीवर असताना सुशांत धाडवेने एकाच चढाईत तीन गडी बाद करून प्रतिस्पर्धी संघावर पहिला लोण लादला आणि आपली आघाडी मोठी केली. त्यातच संतोष केसरकरने काही अफलातून पकडी करून भवानीमाताला निर्णायक आघाडी मिळवून दिली. ओम श्री साईनाथकडून सागर आगटे आणि सर्वेश लाड यांनी चांगला खेळ केला, पण संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.


एक बोकड, ३० कोंबड्यांचे बक्षिस

पुरस्काराच्या रूपाने विजेत्या संघांना आणि खेळाडूंना एका बोकडासह ३० कोंबड्या आणि खेकडे देऊन गौरविण्यात आले. मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर, माजी शाखाप्रमुख महेश सावंत, आगरी कबड्डी महोत्सवाचे आयोजक दिनेश पाटील यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.


हेही वाचा -

प्रभादेवीत बोकडासाठी घुमणार कबड्डीचा दम!

आगरी कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता, भवानीमाता उपांत्य फेरीत

संबंधित विषय
ताज्या बातम्या