Advertisement

वरळी स्पोर्टस क्लब कबड्डीचे भवानीमाताला विजेतेपद


वरळी स्पोर्टस क्लब कबड्डीचे भवानीमाताला विजेतेपद
SHARES

उपांत्य फेरी सामना संपल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत अंतिम सामना खेळणाऱ्या भवानीमाता क्रीडा मंडळाने मुंबईतील उष्म्याला न जुमानता जेतेपदाच्या लढतीत पंचगंगा सेवा मंडळाचा ३३-१७ असा फडशा पाडत वरळी स्पोर्टस क्लब आयोजित द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. गेल्या महिन्याभरात भवानीमाताने पटकावलेले हे तिसरे जेतेपद ठरले याअाधी हिंदमाता कबड्डी, आगरी कबड्डी स्पर्धा जिंकणाऱ्या भवानीमाताने आता वरळी स्पोर्टस क्लब कबड्डी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.


सुशांत धाडवेचा अप्रतिम खेळ

सुपर फॉर्मात असलेल्या पंचगंगाच्या सर्वच खेळाडूंनी अंतिम सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. त्यांच्या चढाईपटूंना भवानीमाताच्या सुरक्षारक्षकांचे जाळे भेदताच आले नाही. चढाईत चपळता दाखवणाऱ्या सुशांत धाडवेने काही अफलातून पकडी करून भवानीमाताची जेतेपदाच्या दिशेने आगेकूच कायम ठेवली. उत्तरार्धातही भवानीमाताने आपल्या गुणांचा जयघोष कायम ठेवत ३३-१७ अशा सहज आणि सोप्या विजयासह मोसमातील तिसऱ्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यात तुफान खेळ करणारा अष्टपैलू सुशांत धाडवे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला तर भवानीमाता संघाचाच ओमकार नारकर सर्वोत्तम पकडवीर ठरला. विजेत्या संघाला २१ हजार रूपये आणि झळाळता चषक देऊन गौरविण्यात आले तर पंचगंगाला १५ हजारांवर समाधान मानावे लागले.


अशा रंगल्या उपांत्य लढती

उपांत्य लढतीत ९-१५ अशा पिछाडीवर असूनही संतोष सावंत यांच्या भवानीमाता संघाने उत्तरार्धात संयमाने खेळ करीत जयभारत सेवा संघावर २७-२० अशी मात करीत अंतिम फेरीत धडक मारली. त्याअाधीच्या उपांत्य सामन्यात पंचगंगाने अप्रतिम खेळ करीत जय ब्राह्मणदेवची धुळधाण उडवली. या एकतर्फी सामन्यात पंचगंगाने ५१-११ असा ४० गुणांनी मोठा विजय नोंदविला.


हेही वाचा -

वरळी स्पोर्टस कबड्डी : जय ब्राह्मणदेव, जयभारत उपांत्य फेरीत

वरळी स्पोर्टस कबड्डी : मातृभूमीची श्री गणेशवर थरारक मात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा