Advertisement

वरळी स्पोर्टस कबड्डी : मातृभूमीची श्री गणेशवर थरारक मात


वरळी स्पोर्टस कबड्डी : मातृभूमीची श्री गणेशवर थरारक मात
SHARES

एकाच चढाईत श्रीकांत मोरेने टिपलेले ३ बळी आणि त्यानंतर सामन्यात साधलेली २५-२५ अशा बरोबरीनंतरही श्री गणेश व्यायामशाळेला मातृभूमी क्रीडा मंडळाकडून २९-३७ अशी हार पत्करावी लागली. वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानात सुरू असलेल्या द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जयभारतने अत्यंत चुरशीच्या सामन्यात अमर क्रीडा मंडळावर ३५-३० अशी मात करीत आगेकूच कायम राखली. अन्य सामन्यात, दिलखूश मित्र मंडळ आणि भवानीमाता क्रीडा मंडळाने प्रतिस्पर्धी संघावर सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.


मातृभूमी ठरली सरस

गौरव गावडेने एकाच चढाईत टिपलेल्या तीन गुणांमुळे मातृभूमीने पहिल्या डावात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, पण श्रीकांत मोरे आणि प्रफुल्ल पवारच्या आक्रमक खेळाने श्री गणेश संघाला मातृभूमीच्या जवळपास ठेवले. उत्तरार्धात एकामागोमाग दोन लोण चढवून मातृभूमीने आघाडी घेतली. दुसरीकडे श्रीकांत मोरेने जोरदार चढाया करून संघाला सामन्यात ठेवण्याचा प्रयत्न ठेवला, पण शेवटच्या तीन-चार मिनिटांत मातृभूमीच्या गुणांना श्री गणेशचे खेळाडू रोखण्यात अपयशी ठरले.


जयभारतचा 'जय'

जयभारत सेवा मंडळ आणि अमर क्रीडा मंडळ यांच्यातील लढतही रंगतदार झाली. आकाश चव्हाण आणि मनीष दळवीने जयभारतला १७-१४ अशी आघाडी मिळवून दिली होती. अमरकडून स्वप्नील साळवी आणि तुषार तळेकरने चढाया-पकडींचा दमदार खेळ करीत सामन्यात रंगत राखली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी एकमेकांना तोडीस तोड उत्तर दिल्यामुळे गुणफलक २८-२७ असा होता, पण शेवटची चार मिनिटे जयभारतला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरली.


भवानीमाताचा सहज विजय

तिसऱ्या सामन्यात सुशांत धाडवेच्या भन्नाट खेळामुळे भवानीमाता क्रीडा मंडळाने हिंदकेसरीचा ३६-१४ असा धुव्वा उडवला तर दिलखूशने प्रभादेवीच्या जयदत्तची ४२-१२ अशी धूळधाण उडवली. या एकतर्फी सामन्यात दिलखूशने पूर्वाधात दोन आणि उत्तरार्धात दोन असे चार लोण चढवून जयदत्तच्या खेळाडूंना मैदानात उभेच राहू दिले नाही.


हेही वाचा -

वरळी स्पोर्टस क्लब कबड्डी : जय ब्राह्मणदेवची जोरदार सलामी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा