Advertisement

वरळी स्पोर्टस क्लब कबड्डी : जय ब्राह्मणदेवची जोरदार सलामी


वरळी स्पोर्टस क्लब कबड्डी : जय ब्राह्मणदेवची जोरदार सलामी
SHARES

तब्बल दोन हजार कबड्डीप्रेमींची गर्दी, कबड्डी संघांचा सळसळता उत्साह आणि आयोजकांच्या नीटनेटक्या आयोजनात सुरू झालेल्या वरळी स्पोर्टस क्लबच्या द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जय ब्राह्मणदेवने ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्टचा ३३-२७ असा पराभव करत दमदार विजयी सलामी दिली. तसंच पंचगंगा, अमर सुभाष आणि साई के दिवाने या संघांनीही दणदणीत विजयाची नोंद केली.


कबड्डीपटूंचा सळसळता उत्साह

क्रिकेटचं माहेरघर असलेल्या वरळी स्पोर्टस क्लबच्या मैदानात ओम श्री साईनाथ आणि जय ब्राह्मणदेव यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात कबड्डीप्रेमींना जोरदार खेळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे वर्षभरात प्रथमच होत असलेल्या कबड्डी स्पर्धेचे सामने पाहायला दोन हजारांपेक्षा अधिक कबड्डीप्रेमींची गर्दी उसळली होती. ही गर्दी पाहून कबड्डीपटूंचाही उत्साह द्विगुणित झाला होता.


दोन लोण, ब्राह्मणदेवची बाजी

साईनाथ आणि ब्राह्मणदेव यांच्यातला सामना मध्यंतराला १७-१७ असा बरोबरीत थांबला होता. ब्राह्मणदेवच्या अमोल गावडे, साईनाथ मोहिते आणि ओम साईनाथच्या सागर आगटे आणि सर्वेश लाड यांच्या आक्रमक खेळामुळे काँटे की टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही संघांचा गुणफलक समांतर चालला होता. सामना संपायला सहा मिनिटे असताना साईनाथवर दुसरा लोण पडला आणि येथेच साईनाथ मागे पडली. नंतर जय ब्राह्मणदेवने ३३-२७ अशी बाजी मारली.


एकतर्फी सामन्यात पंचगंगाचा विजय

पंचगंगा आणि वीर नेताजी यांच्यातील सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. मध्यंतराला १५-७ अशी आघाडी घेणाऱ्या पंचगंगाने आपला जोर कायम ठेवत उत्तरार्धात वीर नेताजीवर आणखी एक लोण चढवत हा सामना २७-१७ असा सहज जिंकला. अमर सुभाषने अमरप्रेम संघाचा ४४-२० असा धुव्वा उडवला. साई के दिवाने संघाने नवोदित संघांची ४८-३४ अशी धुळधाण उडवली.


हेही वाचा -

आमदार चषक कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियमला अजिंक्यपद

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा