SHARE

अंतिम फेरीला साजेशा न झालेल्या लढतीत मध्य रेल्वेचा २८-२० असा सहज पराभव करत भारत पेट्रोलियमने अपेक्षेनुसार अामदार चषक कबड्डी स्पर्धेवर कब्जा केला अाणि दीड लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. प्रभादेवीचा राजा गणेशोत्सव मंडळ आणि आमदार सदा सरवणकर यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या फायनलमध्ये काही चढायांचा अपवाद वगळता दोन्ही संघांनी सावध खेळावर भर दिला. त्यामुळे अंतिम फेरीचा थरार अनुभवण्यासाठी अालेल्या प्रेक्षकांचा हिरमोड झाला.


मध्यंतरापर्यंत निरसवाणा खेळ

श्रीकांत जाधवने मध्य रेल्वेचे खाते खोलल्यानंतर विशाल मानेने त्याला बाद केले व पाठोपाठ पेट्रोलियमच्या काशीलिंगला गणेश बोडकेने ‘डॅश’ मारत बाहेर फेकले. ३-३ अशी स्थिती असताना पुढील १३ मिनिटांत निरसवाणा खेळ झाल्याने गुणफलक ६-६ असा बरोबरीत होता. त्यानंतर श्रीकांतने निलेश शिंदे आणि गिरीश इरनाक यांच्या तावडीतून सुटका करून घेत रेल्वेला ९-६ अशी तीन गुणांची आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला पेट्रोलियमकडे ११-१० अशी आघाडी होती.


काशिलिंगची ‘सुपर टॅकल’

उत्तरार्थातही रडाळ खेळाची परंपरा कायम राहिली. श्रीकांत थंडावल्यानंतर रेल्वेच्या विनोद अत्याळकरने चांगला खेळ करीत गुणांची कमाई केली. काशिलींगने रेल्वेवर लोण चढविण्याची संधी गमावली. त्याची ‘सुपर टॅकल’ झाली. अखेर पेट्रोलियमने दोन गडी बाद करीत लोण चढवला आणि रेल्वेवर २२-१७ अशी आघाडी मिळविली. लढतीच्या अखेरच्या काही मिनिटांत रेल्वेच्या श्रीकांतची तीनदा पकड झाली आणि पेट्रोलियमचा विजय निश्चित झाला. शेवटच्या चढाईवर आकाशने २ बळी मिळवत पेट्रोलियमला २८-२० असे विजयी केले.


हेही वाचा -

आमदार चषक कबड्डी : महाराष्ट्र पोलिसांची नाशिक आर्मीवर मात

प्रभादेवीत आमदार चषक कबड्डीसाठी आंतरराष्ट्रीय थाट

संबंधित विषय
ताज्या बातम्या