Advertisement

वरळी स्पोर्टस कबड्डी : जय ब्राह्मणदेव, जयभारत उपांत्य फेरीत


वरळी स्पोर्टस कबड्डी : जय ब्राह्मणदेव, जयभारत उपांत्य फेरीत
SHARES

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या उपांत्यपूर्व फेरांच्या थरारक सामन्यात जय ब्राह्मणदेव आणि जयभारत या संघांनी विजय मिळवून वरळी स्पोर्टस क्लबच्या द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच भवानीमाता आणि पंचगंगा या दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघांची धुळधाण उडवत उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा सहजगत्या पार केला.


रंगतदार लढती

वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानात सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या रंगतदार लढती पाहायला मिळाल्या. पहिला सामना मध्यंतरापर्यंत एकतर्फीच वाटत होता. ब्राह्मणदेवच्या साईनाथ मोहितेने एकाच चढाईत चार गडी बाद पेले आणि साई के दिवानेवर पहिला लोण चढवला. साई के दिवानेच्या चेतन तोंडवळकरने अनपेक्षितपणे चढाईत तीन गुण टिपत ब्राह्मणदेवच्या रक्षकांना भेदले. पण जय ब्राह्मणदेवने २८-२७ अशा एका गुणाच्या फरकाने हरणारा सामना जिंकत उपांत्य फेरी गाठली.


जयभारतला मातृभूमीची कडवी टक्कर

आकाश चव्हाण आणि तेजस मोरे यांनी चांगल्या चढाया करून जयभारत संघाला आघाडीवर अाणले. मध्यंतरानंतर सामना पूर्णपणे जयभारतच्या बाजूने ३८-२७ असा झुकला होता. सामना संपायला अवघी २ मिनिटे असताना अंकित चाळकेने ४ गडी बाद केले. त्यानंतरही सुरेख कामगिरी करत मातृभूमीने ३८-३७ अशी झेप घेतली. अखेर आकाश चव्हाणने अखेरच्या चढाईत मातृभूमीचे दोन खेळाडू बाद करत ४०-३७ अशा फरकाने विजयाची माळ गळ्यात घातली.


पंचगंगा, भवानीमाताचे एकतर्फी विजय

अन्य दोन्ही सामने फारसे रंगलेच नाहीत. पंचगंगा सेवा मंडळाने अमर सुभाष क्रीडा मंडळावर ३२-२३ असा विजय मिळविला तर भवानीमाताने सुशांत धाडवेच्या अफलातून चढायांमुळे दिलखूश संघावर ४ लोण चढवत ४१-७ अशी मात केली.


हेही वाचा -

वरळी स्पोर्टस कबड्डी : मातृभूमीची श्री गणेशवर थरारक मात

वरळी स्पोर्टस क्लब कबड्डी : जय ब्राह्मणदेवची जोरदार सलामी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा